_*भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी.फार्मसी विभागाला NBA मानांकन….*_
_*हा सन्मान मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय….*_
सावंतवाडी
_येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharm) या अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन (NBA) कडून अधिकृत मानांकन प्राप्त झाले असून हे मानांकन मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिलेच फार्मसी महाविद्यालय ठरले आहे. या मानांकनाची वैधता ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असणार आहे._
_नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन ही राष्ट्रीय स्तरावरील स्वायत्त संस्था असून ती तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेचे कठोर निकषांवर मूल्यमापन करते. हे मानांकन मिळवण्यासाठी महाविद्यालयाला प्रदीर्घ प्रक्रियेतून जावे लागले. यात कॉलेजमधील अध्यापन पद्धती, प्राध्यापकांची उच्च शैक्षणिक पात्रता, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचा निकाल, प्लेसमेंट आणि उद्योगांशी असलेला समन्वय अशा विविध बाबींचे तज्ज्ञ समितीकडून निरीक्षण करण्यात आले. सर्व निकषांवर कॉलेज पात्र ठरल्याने हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे._
_या उल्लेखनीय यशाबद्दल कॉलेजचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे फार्मसी शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी व पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा निर्धार संस्थेने या निमित्ताने व्यक्त केला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप, विभागप्रमुख स्नेहा सावंत, सत्यजित साठे व संपूर्ण डी.फार्मसी टीमचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले._
