मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील तेरावा सामना क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर दोन सुपर ओव्हरनंतर थरारक आणि संस्मरणीय विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठा कायम राहिलेल्या या सामन्याने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले.
प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ६ गडी गमावून १८७ धावा उभारल्या. क्विंटन डी कॉकने ४१ चेंडूंमध्ये ५९ धावांची संयमी आणि प्रभावी खेळी साकारली. रायन रिकेल्टनने २८ चेंडूंमध्ये ६१ धावांची स्फोटक खेळी करत डावाला गती दिली. डेव्हिड मिलरने नाबाद २०, तर मार्को यान्सेनने अवघ्या ७ चेंडूंमध्ये १६ धावा जोडत संघाला भक्कम धावसंख्या मिळवून दिली. अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह ओमरझईने ३, तर राशिद खानने २ बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्ताननेही तितकाच जोरदार प्रतिकार केला. रहमानुल्लाह गुरबाजने ४२ चेंडूंमध्ये ८४ धावांची वादळी खेळी करत सामना रंगतदार बनवला. अझमतुल्लाह ओमरझईने २२, तर राशिद खानने २० धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक टप्प्यावर मारा करत सामन्याचे पारडे फिरवले. अफगाणिस्तानचा डाव १९.४ षटकांत १८७ धावांवर संपला आणि सामना बरोबरीत राहिला.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने १ षटकात बिनबाद १७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १ षटकात १ गडी गमावून १७ धावा करत सामना पुन्हा बरोबरीत आणला. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरची वेळ आली आणि थरार आणखी वाढला.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला १ षटकात २ गडी गमावून १९ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी आक्रमक फटकेबाजी करत अवघ्या १ षटकात बिनबाद २३ धावा करत सामना संपवला आणि दक्षिण आफ्रिकेला थरारक विजय मिळवून दिला.
३ बळी आणि निर्णायक क्षणी केलेल्या संयमी गोलंदाजीसाठी लुंगी सानी एनगिडीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने गट ‘ड’ मधील आपले स्थान अधिक भक्कम केले. दोन सुपर ओव्हरपर्यंत गेलेला हा सामना टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम आणि संस्मरणीय लढतींपैकी एक ठरला.
