You are currently viewing मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्रमांक – ३ मध्ये पी.एम. श्री. दत्त विद्यामंदिर वैभववाडी जिल्ह्यात प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्रमांक – ३ मध्ये पी.एम. श्री. दत्त विद्यामंदिर वैभववाडी जिल्ह्यात प्रथम

*मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्रमांक – ३ मध्ये पी.एम. श्री. दत्त विद्यामंदिर वैभववाडी जिल्ह्यात प्रथम*

*शालेय आवारातील वृक्षलागवड व वृक्षांची माहिती देणारे क्यूआर कोड ठरले विशेष आकर्षण.*

वैभववाडी

दि. ३ नोव्हेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा टप्पा क्रमांक – ३ यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या अभियानात प्राथमिक शाळा गटात पी.एम. श्री. दत्त विद्यामंदिर, वैभववाडी या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या अभियानांतर्गत शाळेतील पायाभूत व भौतिक सुविधा, विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम, विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपलब्ध सोयी-सुविधा, विविध समित्यांचे कार्य, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, कला-क्रीडा व स्काऊट-गाईड विषयातील कामगिरी, भाषा व गणित विषयांतील अध्ययन स्तर, स्वच्छतागृहे, पोषण आहार, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आनंददायी शिक्षण, पर्यावरणपूरक उपक्रम, शालेय दस्तऐवजीकरण, बोलक्या भिंती, शालेय परिसराची सजावट, शालेय कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी तसेच शिक्षकांनी प्राप्त केलेल्या वाढीव शैक्षणिक अर्हता अशा विविध निकषांवर आधारित २०० गुणांचे सखोल मूल्यांकन करण्यात आले.
या मूल्यांकनात वैभववाडी तालुक्यात पी.एम. श्री. दत्त विद्यामंदिर शाळेने प्रथम क्रमांक पटकावल्याने शाळेस जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट देऊन पुनर्मूल्यांकन केले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. श्रीमती निलिमा नाईक, डाएट अधिव्याख्याता मा. श्री. संदीप पवार, उपशिक्षणाधिकारी मा. श्रीमती फारुकी मॅडम व उपशिक्षणाधिकारी मा. श्री. प्रजापती थोरात उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय मूल्यांकन स्पर्धेतही शाळेने आपले प्रथम क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले. विशेष बाब म्हणजे शालेय परिसरात करण्यात आलेली वृक्षलागवड व प्रत्येक वृक्षाची माहिती देणारे क्यूआर कोड हे उपक्रम परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.
या यशस्वी वाटचालीसाठी श्री. अशोक वडर, गटशिक्षणाधिकारी वैभववाडी, श्री. विजय केळकर, गटसमन्वयक वैभववाडी,केंद्रप्रमुख श्री. रामचंद्र जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिनकर केळकर, शिक्षक श्री. अविनाश औटे, श्रीमती रेखा धावले व श्रीमती अहिल्या लांडगे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालकांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, पत्रकार श्री. संजय शेळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. तेजस साळुंखे, समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक व सर्व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान शाळांना अधिक सुंदर, सुरक्षित व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बनवण्याचा एक प्रभावी उपक्रम ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा