माजगाव पंचायत समिती निवडणूक : आबा सावंत यांची माघार, जितेंद्र गावकरांना जाहीर पाठिंबा
सावंतवाडी
माजगाव पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवार तथा माजगावचे माजी सरपंच आबा सावंत यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. मराठा समाजातील दुसरे अपक्ष उमेदवार जितेंद्र उर्फ जितू गावकर यांच्या समर्थनार्थ हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी वेत्ये येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून अन्य प्रवर्गातील उमेदवार दिल्यामुळे आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मराठा समाजात फूट पडू नये, या व्यापक हिताचा विचार करून आपण माघार घेत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. यासाठी वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांनी मध्यस्थी केल्याचेही त्यांनी सांगितले.
आबा सावंत म्हणाले की, गेली अनेक वर्षे जितेंद्र गावकर प्रामाणिकपणे सामाजिक व राजकीय काम करत आहेत. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. इतर कोणत्याही पक्षाकडून मराठा समाजातील उमेदवार नसल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र समाजहितासाठी आपण गावकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहोत.
यावेळी जितेंद्र गावकर यांनी आबा सावंत यांच्या निर्णयाबद्दल आभार मानत हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सरपंच गुणाजी गावडे यांनीही सावंत यांच्या भूमिकेचे स्वागत केले. पत्रकार परिषदेस गुरुदास गावकर (तंटामुक्ती अध्यक्ष), गोविंद गावडे, तन्मय पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
