सावंतवाडी तालुक्यात भाजपची खरी ताकद स्पष्ट; मायकल डिसोजा यांच्यावर महेश सारंग यांचा जोरदार पलटवार
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यात आज भाजपचे उमेदवार महेश सारंग यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. आज मायकल डिसोजा यांना शिवसेनेसह अपक्षांची ताकद घ्यावी लागत असल्यानेच या मतदारसंघातील भाजपची खरी ताकद किती आहे हे स्पष्ट होत असल्याचे सारंग यांनी सांगितले.
ते म्हणाले की, त्यांच्या मागे नेमकी कोणाची ताकद आहे हे मला माहिती नाही; मात्र कितीही दावे केले तरी ९ तारखेला गुलाल हा माझाच असणार असा ठाम दावा त्यांनी यावेळी केला.
सारंग पुढे म्हणाले की, भाजपच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून जनता या विकासकामांच्या पाठीशी उभी राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात येत आहेत, ते सिद्ध करून दाखवावेत; अन्यथा थेट पोलिस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार दाखल करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
जर मी जिल्हा बँक किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गैरवापर करत असेन, तर त्याची चौकशी व्हावी, अशी खुली आव्हानात्मक भूमिका सारंग यांनी मांडली.
धनशक्तीचा वापर करण्याची मला गरज नाही. आम्ही केलेली विकासकामे हाच आमच्या विजयाचा खरा आधार आहे. तसेच, आज जे जे पक्ष बदलून आले आहेत, ते ते पक्ष संपुष्टात आले म्हणूनच आमच्याकडे आले आहेत. आमच्या घरात किती पदे आहेत, हे जाहीर करावे; उगाच बिनबुडाचे आरोप करू नयेत, असेही महेश सारंग यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
