प्रचार कार्यालय उद्घाटनात मायकल डिसोजा यांचा आरोपांचा भडिमार; जिल्हा बँक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या गैरवापराचा गंभीर दावा
सावंतवाडी :
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या दांडगी हुकूमशाही सुरू असून तिची तीव्रता सामान्य नागरिकांच्या कल्पनेपलीकडची आहे, असा आरोप मायकल डिसोजा यांनी केला. येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. येणाऱ्या निवडणुकीत जनता या हुकूमशाहीला निश्चितच धडा शिकवेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डिसोजा यांनी आज जिल्हा बँकेचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केला. “ही हुकूमशाही नेमकी कुठून येते? याकडे वरिष्ठ नेत्यांचे लक्ष नाही का?” असा सवाल उपस्थित करत, अन्यथा याची किंमत जिल्हा बँकेलाही मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सत्ताधाऱ्यांना आलेल्या सत्तेच्या ब्रह्माचा भोपळा येत्या ९ तारखेला निश्चितच फुटेल आणि जिल्हा परिषदवर जाण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहील, असा हल्लाबोल त्यांनी केला. “आज सर्वच पदे एका घरात एकवटली आहेत; अजून किती पदे हवी आहेत?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताकेंद्रित कारभारावर कडाडून टीका केली.
कोलगाव मतदारसंघातील जनता या हुकूमशाहीला पूर्णपणे कंटाळलेली असून ९ तारखेला मतदानातूनच त्याचे उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त करत, प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाऊन पत्रक वाटप करत आशीर्वाद देण्याचे आवाहन मायकल डिसोजा यांनी केले.
