सतीश सावंत यांचा आज भाजपात प्रवेश; सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी उलथापालथ
कणकवली :
उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आज, शनिवार १ फेब्रुवारी रोजी, भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सायंकाळी ठीक आठ वाजता कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुक ग्रामपंचायत समोरील कोकण रिट्रीट हॉल येथे होणार आहे.
या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळ्यास पालकमंत्री नितेश राणे हे स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीतच सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने या घटनेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांच्या विरोधात उबाठा सेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले सतीश सावंत आता थेट भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने उबाठा सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील उबाठा सेनेची राजकीय गणिते पूर्णतः बिघडली असून अनेक नेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भाजपच्या पक्षप्रवेश झंझावातापुढे उबाठा सेनेचे अनेक एक्के गळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे..
