तळवडे जि.प.साठी संदीप गावडे, मळगाव-नेमळे पं.स.साठी गौरव मुळीक यांचा विकासकेंद्रित प्रचार
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून भारतीय जनता पक्षाकडून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर तळवडे जिल्हा परिषद व मळगाव-नेमळे पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांनी डोअर-टू-डोअर प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.
तळवडे जिल्हा परिषदेसाठी संदीप गावडे तर मळगाव-नेमळे पंचायत समितीसाठी गौरव मुळीक हे निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांनी प्रचारादरम्यान रस्ते, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच गावातील इतर मूलभूत प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासनही उमेदवारांकडून देण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती मतदारांना देण्यात आली. भाजपच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी विकासाभिमुख राजकारणावर विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या विकासकामांचा उल्लेख करत पुढील काळातही गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
या डोअर-टू-डोअर प्रचारात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीत विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत भाजपला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल, असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
