महायुतीच्या प्रचार मेळाव्यात पारदर्शकतेचा मुद्दा, सहाही गावांतील कार्यकर्त्यांची एकजूट आणि विजयाचा विश्वास
सावंतवाडी :
“ही माझी पहिलीच निवडणूक असली, तरी राजकारणाचे धडे मला घरातूनच मिळाले आहेत,” असे सांगत माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी माजगाव येथे झालेल्या भव्य प्रचार मेळाव्यात मतदारांशी मनापासून संवाद साधला. स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या मंत्रिपदाच्या काळात आपला जन्म झाला, आजोबा व वडिलांचा पारदर्शक व्यवहार हा आपला आदर्श असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
मेळाव्याला माजगाव, चराठा, ओटवणे, वेत्ये, सोनुर्ली व सरंबळे या सहाही गावांतील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रचाराचा नारळ वाढवत प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली.
विरोधकांवर थेट भाष्य करताना विक्रांत सावंत म्हणाले, “माणसं गोळा करण्यासाठी आम्हाला पैशांची गरज नाही. आम्ही माणसं प्रेमाने कमावली आहेत. त्यामुळे पैशाच्या जोरावर होणाऱ्या राजकारणाला थारा देऊ नका आणि सुशिक्षित, अभ्यासू उमेदवाराला साथ द्या.”
मार्गदर्शन करताना माजी सभापती अशोक दळवी यांनी केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी सहाही गावांतील सरपंच महायुतीसोबत असल्याने विजयाचा मार्ग सुकर असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती उमेदवार सचिन बिर्जे व उत्कर्षा गांवकर यांनीही विकासाबाबत आपली भूमिका मांडली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजगावचे सरपंच रिचर्ड डिमेलो, वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे, सोनुर्लीचे सरपंच नारायण हिराप, चराठ्याच्या सरपंच प्रचिती कुबल यांच्यासह महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी आणि सहाही गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
