फोंडाघाटमध्ये हेवी वाहतुकीला पूर्णविराम;
पुलाचे पाडकाम सुरू, एक महिन्यात नवीन पूल उभारणीचे आश्वासन
फोंडाघाट
फोंडाघाट येथे आजपासून हेवी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून या निर्णयाचे फोंडाघाट वासियांनी स्वागत केले आहे. पुलाच्या संरचनात्मक दुरवस्थेमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्व हेवी वाहतूक बावडा मार्गे वळवण्यात आली आहे.
फोंडाघाट येथील पुलाचे पाडकाम आजपासून सुरू झाले असून हे काम युद्धपातळीवर चालू आहे. संबंधित कंत्राटदाराने हा पूल एका महिन्यात पूर्ववत करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर येथील दुसरा इंग्रजकालीन सापळे पूलही पाडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, लहान वाहनांसाठी पर्यायी बायपास मार्ग तयार करण्यात आला असून दोन्ही बाजूंना सूचना फलक लावून प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस व प्रशासन सतर्क आहे.
या संपूर्ण उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया फोंडाघाट वासियांकडून दिली जात आहे.
— अजित नाडकर्णी, शुभांजित श्रुष्टी
