कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथील ‘सिद्धिविनायक एंटरप्रायझेस’ या हार्डवेअर दुकानाला मध्यरात्री सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. रत्नदीप सावंत यांच्या मालकीच्या या दुकानाला लागलेल्या आगीत प्लास्टिक साहित्य, पाईप्ससह इतर हार्डवेअर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आग इतकी भयानक होती की दुकानातील लोखंडी पाईप्स आणि अँगल देखील आगीच्या उष्णतेने पूर्णतः वाकून गेले. तसेच दुकानाबाहेर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या डीआय वाहनालाही आगीची झळ बसून त्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
