You are currently viewing प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*“प्रजासत्ताक दिन”*

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले आणि संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९रोजी ते स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अमलात आले.

जवाहरलाल नेहरू यांनी ३१डिसेंबर १९२९ रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकवून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती, त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडला गेला. या दिवसाला *भारतीय प्रजासत्ताक दिन* असे संबोधले जाते.

देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण करून त्याला मानवंदना दिली जाते, राष्ट्रगीत म्हटले जाते आणि देशाबद्दल आदर व्यक्त केला जातो.

हा दिवस आपल्या भारतासाठी सुवर्ण दिन आहे. शाळा महाविद्यालयातून २६ जानेवारी हा राष्ट्रीय सण देशभक्ती व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. हजारो देशभक्तांच्या बलिदानातून भारत माता स्वतंत्र झाली. या हुतात्म्यांचे स्मरण— हा राष्ट्रीय सण साजरा करण्यामागचा हेतू असतो.

पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते. संसद भवन च्या दरबार हॉलमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर इर्वीन स्टेडियम मध्ये त्यांनी राष्ट्रध्वज फडकवला होता.

या दिवशी भारताच्या राजधानीत, नवी दिल्ली येथे मोठे संचलन आयोजित केले जाते. राजपथ मार्गे ते राष्ट्रपती भवनापर्यंत ते जाते. तत्पूर्वी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक *अमर जवान ज्योती* येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपती येताच ध्वजारोहण होते. राष्ट्रगीताची धून वाजवली जाते आणि २१ तोफांची सलामी दिली जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात भारतातील सर्व राज्यांचा सहभाग असतो. आणि अनेक कलात्मक देखावे विविध प्रकारे सादर केले जातात.त्यांत प्रामुख्याने पौराणिक,ऐतिहासिक,सामाजिक घटनांचे अर्थपूर्ण सादरीकरण असते. हा सोहळा अतिशय प्रेरणादायी आणि मनोरंजकही असतो.

देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र, कीर्ती चक्र हे मुख्य मानाचे पुरस्कार दिले जातात. तसेच देशाच्या निरनिराळ्या भागातल्या साहसी बालकांचाही सत्कार केला जातो.

या दिवशी भारतीय फौजांचेचे (नौदल पायदल आणि वायुसेना ) संचलन होते. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. अशा प्रकारचे संचलन भारतातील सर्व राज्यात होते आणि त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

भारताला प्रजासत्ताक देश म्हणून ओळखले जाते कारण भारतातील लोक, राज्य सरकारचे प्रमुख निवडतात. प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही.प्रजेची सत्ता असणारे राष्ट्र. आपल्या देशातली लोकशाही जगाच्या तुलनेत सर्वोच्च मानली जाते. आज संपूर्ण भारत *७५ वा प्रजासत्ताक दिन* मोठ्या अभिमानाने आणि एकतेच्या भावनेने साजरा करण्यासाठी सज्ज आहे.

२६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन.

एक राष्ट्रीय सण.

देशाच्या स्वातंत्र्य अखंडतेचे प्रतीक.

या पवित्र दिनी भारतीयांच्या मनात आज नेमक्या कुठल्या भावना असतील? सद्यस्थितीत भारताच्या राजकारणाचा आढावा घेताना सामान्य भारतीय नागरिक आज फारच गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्याला हवा आहे स्वच्छ, पारदर्शक, जनताभिमुख, एकात्मतेने, राष्ट्रीय उद्देशाने, लोकशाही पद्धतीने चालणारे शासन.

महासत्ताक भारत, माझा भारत महान भारत, अशा नुसत्या घोषणा नकोत. १४० कोटी जनतेला अखंडत्वाच्या सूत्रात बांधून ठेवणारी कृतीशीलता हवी आहे. शासन आणि जनतेत विश्वासाचं वातावरण हवं. मतभेदांना जागा नको.

ध्वजारोहण होईल, उंच गगनात तिरंगा फडकेल आणि देशभर एकच नाद घुमेल— *मी देशाचा देश माझा* आजच्या राष्ट्रीय सण साजरा करण्यामागे केवळ हीच भावना जागृत असावी.

 

*राधिका भांडारकर पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा