कॉयर उद्योगातील उद्योजकांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे विशेष आमंत्रण
नाविन्यपूर्ण उपक्रमांची केंद्र सरकारकडून दखल; एमएसएमई मंत्रालयातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष सन्मान
सिंधुदुर्ग :
दिल्लीतील कर्तव्यपथ येथे होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉयर (नारळ तंतू) क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. जिल्ह्यात कॉयर उद्योगाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण, परिणामकारक व रोजगारनिर्मिती करणाऱ्या उपक्रमांची दखल घेत केंद्र सरकारने हा सन्मान बहाल केला आहे.
या राष्ट्रीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून श्रुती रेडकर, सुजाता देसाई, संदीप देसाई, गीता गावडे, अनिल गावडे, रिया चव्हाण, रविंद्र चव्हाण, रुची राऊळ, राजाराम राऊळ यांच्यासह जिल्हा जनसंपर्क अधिकारी तथा कॉयर अधिकारी श्रीनिवास बिटलिंगू आणि पत्रकार सचिन रेडकर यांचा विशेष सहभाग राहणार आहे.
सदर उद्योजकांनी कॉयर उत्पादन, प्रक्रिया व विक्री या क्षेत्रात अनेक महिलांना तसेच स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामीण भागात स्वयंपूर्णतेचा आदर्श उभा करत आर्थिक सक्षमतेकडे नेणारे हे प्रयत्न आज राष्ट्रीय पातळीवर प्रेरणादायी ठरत आहेत. सिंधुदुर्गच्या कॉयर क्षेत्राला मिळालेली ही ओळख जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, आगामी काळात या उद्योगाच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एमएसएमई मंत्रालयातर्फे विशेष सन्मान
कॉयर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एमएसएमई मंत्रालयातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला. केंद्रीय एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी यांच्या हस्ते व एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजी यांच्या विशेष उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील समर्थ कॉयर इंडस्ट्रीच्या उद्योजिका श्रुती सचिन रेडकर यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या वतीने कॉयर क्षेत्रातील वाटचाल व भविष्यातील संधी प्रभावीपणे मांडल्या.
कार्यक्रमाला कॉयर बोर्डचे चेअरमन विपुल गोयल, सह संचालक डॉ. षणमुगासुंदरम, जनसंपर्क अधिकारी तंकचन, विकास अधिकारी (इंडस्ट्रीज) सुरेश कुमार तसेच प्रादेशिक कार्यालय प्रमुख श्रीनिवास बिटलिंगू आदी मान्यवर उपस्थित होते.
ही राष्ट्रीय पातळीवरील दखल म्हणजे सिंधुदुर्गच्या मेहनती उद्योजकांच्या कार्याला मिळालेली पावती असून, कॉयर उद्योगाच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरत आहे.
