You are currently viewing सावली

सावली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*सावली*

 

लहानपणी माझं आणि माझ्या धाकट्या बहिणीचं भांडण झालं की ती अगदी तत्परतेने आजीजवळ माझी तक्रार करायची आणि आजी नेहमीच तिच्याच बाजूची. तिच्या समजूतीखातर तिला म्हणायची, “जाऊदे गं बाबी! आपण किनई तिचं घर उन्हात बांधू.”

मीही लहानच होते ना? या उन्हातल्या घराची मला तेव्हा फार भीती वाटायची आणि मीही ठरवायची,” मी कशाला उन्हातल्या घरात राहू? हे उन्हातलं घर मी सावलीत नेईनच.”

 

आता जेव्हा मी विचार करते तेव्हा या घटनेचे पडसाद खूप निराळे अर्थ घेऊन उमटतात. जिथे उन असते तिथे सावली ही असते.उन म्हणजे काहीतरी तापतदायक आणि सावली म्हणजे दिलासा, भरवसा, दाहकतेवरचा एक शीतल अनुभव, जीवनातला गारवा. ‘उन्हातलं घर सावलीत नेण्याच्या’ माझ्या संकल्पातून अगदी नकळतपणे सहज “मी दुसऱ्यांच्या आयुष्यात सावली बनून राहीन” असे जणू काही वचनच नाही का दिले?

 

“लहान माझी बाहुली मोठी तिची सावली”

हे गाणं आईच्या तोंडून जोजवताना, घास भरवताना ऐकलं. पुढे पाठ्यपुस्तकातून पाठ करून स्वतःही अनेकदा म्हटलं. अगदी आज सुद्धा माझ्या अमेरिकन नातींना ॲक्शन आणि ॲक्टिंग करत हे गाणं म्हणत खूप खूप हसवलं. याच क्षणी जणू काही माझा स्टॅच्यू होतो. कोण होती ही लहान बाहुली जिने सदैव मला मोठी सावली दिली? कधीच कसं मी तिला जाणून घेतलं नाही? ओळखलं नाही? जी सतत माझ्याबरोबर होती, जिच्या मायेच्या सावलीत मी आयुष्यभर निवांतपणे राहिले? आजीच्या रूपात ,माय पित्यांच्या स्वरूपात, भावंडात,मित्र मैत्रिणी, सखे सोबती, आयुष्याचा जोडीदार आणि नंतरच्या पर्वात लाडक्या मुलींच्या रूपात मोठी सावली देणारी ही लहान बाहुली होतीच की नाही? नव्हे ती आजही आहेच की आपल्याबरोबर. तिचं अस्तित्व आहेच.

 

शालेय जीवनात सावलीचा वैज्ञानिक अर्थही समजून घेतला. सावली म्हणजे प्रकाशाचा अभाव. सूर्य किंवा दिवा अथवा कुठल्याही प्रकाशाच्या वाटेत प्रकाश आरपार जाऊ न देणारी अपारदर्शक वस्तू येते तेव्हा त्या वस्तुची सावली त्याच्या विरुद्ध बाजूला पडते. प्रकाश आणि वस्तुच्या अंतरावर या सावलीचा आकार अवलंबून असतो. ही सावली जमिनीवर, भींतीवर किंवा तत्सम पृष्ठभागावर पडते. या शास्त्रीय व्याख्येनुसार भींतीवरचा सावल्यांचा खेळ खूपच मजेदार असायचा. हाताची बोटं विशिष्ट पद्धतीने एकमेकात गुंतवून विविध प्राणी पक्ष्यांचे आकार घेऊन उमटवलेल्या सावल्या खूप गमतीदार आणि मनोरंजक वाटायच्या.

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही भींतीवरच्या सूर्याच्या बदलणाऱ्या दशांच्या सावल्याही मनाला त्या त्या वेळी रमवतात.

“हा सूर्य हा जयद्रथ” या महाभारतातल्या युगंधराच्या वाक्यात याच उनसावल्यांचा अर्थ दडलेला आहेच की.

 

पण मनाच्या उदासीनतेत, एकटेपणाच्या भावनेत रुतलेले असताना, सांजवेळी हुरहुरणाऱ्या स्थितीत, उदास, दुःखी मानसिकतेत हा सावल्यांचा खेळ खरोखरच भयाण भीतीदायकही असतो. कधीकधी झाडांच्या पायथ्याशी पडलेली अंधारी सावली,खिडकीच्या तावदानावर बाहेरच्या हलणार्‍या चित्रविचित्र सावल्या मनातले नकारात्मक विचार अधिक गडद करतात पण त्याचवेळी देव्हाऱ्यात उजळवलेली समईची ज्योत आणि ईश्वर मूर्तीला प्रकाशून त्याच्या पाठीमागे उमटलेली त्या मूर्तीची सावली अचानक आधारभूत, दिलासा देणारी वाटते. त्या सावलीशी आपला सुखद संवाद घडतो. “भिऊ नको मी तुझ्या जवळच आहे.”

मग अशी ही अज्ञात शक्तीची सावली अध्यात्मिक भासू लागते. तेव्हा मात्र वाटते,

 

।। आभास सावली हा असतो खरा प्रकाश

 

जे सत्य भासती ते असते नितांत भास

 

हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा।।

 

तसे लाक्षणिक अर्थाने सावली या शब्दाचे विविध अविष्कार अनुभवायला मिळतात.

सावली म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रतिकृती, प्रतिबिंब, पाठराखण, संरक्षण किंवा जवळचा साथीदार अथवा एखाद्या गोष्टीत दुसऱ्या गोष्टीचा अंश किंवा प्रभावही दर्शविते.

मायेची सावली, कुणासाठी सावली बनून राहणे किंवा कुणाच्या सावलीत जगणे म्हणजेच कुणावरती अवलंबून असणे ..

काही सावल्या आठवणीतल्या असतात. त्या भिरभिरतात मनामध्ये. काही सुखद असतात. भूतकाळातल्या या आठवणींच्या सावल्या कधी वर्तमान काळ उजळवतात तर काही छळतात, घाबरवतात, भीतीदायक पाठलाग करतात, आक्राळविक्राळ, विकृत बनून रहस्यमय, भयाणही होतात.

 

ढळला रे ढळला दिन सखया

संध्याछाया भिवविती हृदया

आता मधुचे नाव कासया

लागले नेत्र हे पैलतिरी

 

अशाही असतात सावल्या ज्या निवृत्तीच्या, निरोपाच्या क्षणाला जाऊन भिडतात. परिपूर्णतेचं समाधान आणि त्याचबरोबर जीवनाच्या समाप्तीची हळुवारपणे सूचना देतात.

 

 

थोडक्यात आयुष्याचा हा साराच खेळ सावल्यांचा आहे. या सावल्यांचा रंग मात्र एकच आहे.

कृष्ण- काळा- करडा-

 

*राधिका भांडारकर पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा