सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रश्नांवर कृती समिती आक्रमक;
लेखी आश्वासन न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित समस्या, अपुरी आरोग्यसेवा आणि रिक्त पदांच्या प्रश्नावरून उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून येत्या २४ जानेवारीपर्यंत मागण्यांबाबत ठोस लेखी आश्वासन न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी रुग्णालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा समितीने दिला आहे.
रुग्णालय प्रशासनाने कृती समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. वैद्यकीय अधीक्षक रजेवर असल्याने प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीषकुमार चौगुले यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी मोबाईलद्वारे संवाद साधला. मात्र, केवळ तोंडी आश्वासनांवर समाधान न मानता समितीने लेखी उत्तराची ठाम मागणी केली.
रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत बिकट असून कागदोपत्री ३४ डॉक्टर दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक पदे रिक्त असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. अभिनव फाउंडेशनच्या जनहित याचिकेप्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचने गठीत केलेल्या समितीचा अहवाल येऊन चार महिने उलटले तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी भंगाराने भरलेली खोली रिकामी करून २० रुग्णांचा वॉर्ड सुरू करण्याच्या दिलेल्या सूचनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.
एम.डी. फिजिशियन व रेडिओलॉजिस्टची तातडीने नियुक्ती, रक्तपेढीची साठवणूक क्षमता ४०० बॅगपर्यंत वाढवणे, ट्रॉमा केअर युनिट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, बंद असलेली लिफ्ट सुरू करणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देणे अशा प्रमुख मागण्या कृती समितीने मांडल्या आहेत. २०१३ पासून जनहित याचिका प्रलंबित असतानाही शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
येत्या दोन दिवसांत वरच्या मजल्यावरील वॉर्ड सुरू करण्याबाबत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीविषयी लेखी निर्णय झाल्यासच उपोषणाबाबत फेरविचार केला जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे. या बैठकीला एन. बी. रेडकर, रविंद्र ओगले, राजू केळुसकर, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, रविंद्र केरकर, संजय लाड, रवी जाधव, रुपा मुद्राळे, भाऊ पाटील, जितेंद्र मोरजकर, चंद्रकांत घाटे, आर. एम. शिंदे, ए. के. गायकवाड आदी उपस्थित होते.
