आजगाव वाघबीळ परिसरातील पथदिव्यांची तोडफोड;
महागड्या बॅटऱ्या चोरीला
सावंतवाडी
आजगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाघबीळ परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या पथदिव्यांची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी केवळ दिव्यांचे नुकसानच केले नाही, तर त्यातील महागड्या बॅटरी देखील चोरून नेल्या आहेत. गावातील विकासकामांचे अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे उपसरपंच सुशील कामटेकर यांनी संताप व तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आजगाव येथील वाघबीळ परिसरात रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना आणि प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागू नये, तसेच हा परिसर प्रकाशमय व सुरक्षित राहावा या उदात्त हेतूने ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन येथे पथदिवे लावले होते. मात्र, अज्ञातांनी हे दिवे तोडून खाली पाडले आणि त्यातील बॅटरी लंपास केल्या. या कृत्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पथदिवे बंद पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत उपसरपंच सुशील कामटेकर यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विकासासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी करण्यात येणाऱ्या कामात अशा प्रकारे खोडा घालणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे,” असे मत कामटेकर यांनी व्यक्त केले.या चोरीच्या प्रकाराबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा परिसरात कोणी संशयास्पद व्यक्ती आढळल्या असल्यास, त्यांनी तातडीने ग्रामपंचायतीशी किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कामटेकर यांनी केले आहे.
