मिशन आय ए एस अमरावतीचे संस्थापक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना नुकताच मातृ तीर्थ सिंदखेड राजा येथे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे वय आहे वर्षें ७३. आपल्या आयुष्यात साहित्यावर प्रेम करणारे आणि ७६ पुस्तके लिहिणारे जेंव्हा आपल्या घरातील पुस्तकालयात रमतात विद्यार्थी मित्रांना पुस्तके भेट देतात तेव्हा पुस्तकावर प्रेम करणारा साहित्यकार मनात घरं करून जातो.
अमरावतीच्या ‘मिशन आय ए एस’चे संस्थापक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे वयोमानाने ७३ वर्षांचे असले, तरी त्यांच्या मनातील साहित्याची गूढ ओढ अजूनही तितकीच ताजी आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात साहित्यावर प्रेम करीत तब्बल ७६ पुस्तके लिहिली आहेत, जेंव्हा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता होती तेव्हा त्यांना २५ वर्षांपूर्वी आपलं राहते घर व अभ्यासिका विनामूल्य उपलब्ध करून दिले.
आजही ते स्पर्धात्मक परीक्षेचा विद्यार्थी घडवितांना काळजी घेतांना दिसतात. हीच गोष्ट त्यांचं व्यक्तिमत्व फुलविणारी ठरवते.
आपल्या घरातील पुस्तकांच्या कपाटात रमलेले प्रा. डॉ.काठोळे सर म्हणजे जणू ज्ञानाचा सागर. साऱ्या डोंगराएवढ्या पुस्तकांच्या थरात, प्रत्येक पुस्तकाला त्यांचं जिव्हाळ्याचं स्थान आहे. पुस्तकांची पानं उलटताना आणि प्रत्येक ओळीचा अर्थ मनाशी खेळवतांना त्यांच्या डोळ्यातील तेज पुन्हा उजळते. पुस्तकांना केवळ वाचनाचे साधन समजण्यापेक्षा, त्यांना ते आयुष्याचे साथीदार मानतात.
जेंव्हा विद्यार्थी मित्र घरी भेटायला किंवा मार्गदर्शनासाठी येतात तेव्हा प्रा. डॉ.काठोळे सर हर्षाने त्यांना पुस्तके भेट देतात. “पुस्तक हेच सर्वांत सुंदर द्यायचे आणि घ्यायचे गिफ्ट आहे,” असे सांगताना त्यांचा प्रेमळ स्वभाव, साहित्यप्रेमाची निर्भेळ दृष्टी स्पष्ट जाणवते.
एक शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच केले नाही तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, जिज्ञासेला पंखही दिले आहेत .मी सुद्धा त्यांचा एक विद्यार्थी.
प्रा.डॉ.काठोळे सर यांच्या घरातील पुस्तकालय हा प्रत्येक ज्ञानप्रेमींसाठी आदर्श आहे. सन १९७२ मध्ये त्यांनी बहुजन समाजातील नव साहित्यिकांसाठी बहुजन साहित्य परिषद स्थापन केली. तेव्हा पासून ते आजपर्यंत त्यांची ही ग्रंथ संपदा त्यांचे सोबत आहे.हीच त्यांच्या आयुष्याची खरी मिळकत आहे.पुस्तके लिहून प्रकाशित करायची व ज्ञानार्जनासाठी ती फ्री मध्ये वाटायची हाच मुळी त्यांचा छंद. यामध्ये त्यांनी बिझिनेस मॅनेजमेंट कधीच पुढे येऊ दिले नाही. त्यांचे पुस्तकावर अपार प्रेम, लेखनाच्या सागरात “शेतकऱ्यांची मुले झाली कलेक्टर ” या प्रेरणादायी पुस्तकाने शेकडो विद्यार्थ्यांना सनदी अधिकारी होण्याचा मार्ग सुकर केला. प्रा. डॉ.काठोळे सरांनी नवीन पिढीला दिलेला हा सुसंस्कृत साहित्यिक वारसा आहे. तो माझ्यासारख्या विद्यार्थ्याला जपायचा आहे टिकवायचा आहे.
अशा साहित्यप्रिय व्यक्तिमत्वाच्या भेटीने प्रत्येकाच्या मनात ‘पुस्तक, वाचन आणि ज्ञानाची’ एक नवी प्रेरणा उमटते. त्यांच्या कथा, कविता, ललित लेखन, स्पर्धा परीक्षेवरील मार्गदर्शन अशी त्यांची कार्यप्रणाली आणि पुस्तकांविषयी असलेले प्रेम, आयुष्याला अर्थ देणारी विलक्षण कहाणी ठरते. आज त्यांच्या पुस्तकालयात फेरफटका मारताना त्यांचा पुस्तकासोबत फोटो घेण्याचा मोह मला आवरला नाही.
==============
रविंद्र दांडगे.
अमरावती
9404545238
