स्व. भाईसाहेब सावंत – स्व. विकासभाई सावंत यांचा वारसा पुढे नेण्याचा भाजप उमेदवार विक्रांत सावंत यांचा विश्वास
सावंतवाडी : माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व उमेदवार हे आपल्या घरातीलच असल्याने ही निवडणूक मैत्रीपूर्ण वातावरणात होईल, असा विश्वास भाजपचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला. या मतदारसंघाची राजकीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“माजी मंत्री स्व. भाईसाहेब सावंत, स्व. विकासभाई सावंत यांचा राजकीय व सामाजिक वारसा मला लाभला असून, तो पुढे नेण्याचे काम मी करणार आहे,” असे मत विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा रेशमा सावंत, सभापती अशोक दळवी तसेच मतदारसंघातील सर्व गावांतील ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आणि युवकांची ताकद आमच्या सोबत असून, त्यामुळे माजगाव व चराठा पंचायत समिती क्षेत्रातही जनतेचा आशीर्वाद निश्चित मिळेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. सर्वांना एकत्र घेऊन विकासाचा मार्ग पुढे नेण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, उमेदवार सचिन बिर्जे, उमेदवार उत्कर्षा गावकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील ही निवडणूक परंपरा, आपुलकी आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढली जाईल, असा स्पष्ट संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.
