उबाठा उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैध; प्रमोद रावराणेंचा विजयाचा मार्ग सुकर
वैभववाडी :
वैभववाडी तालुक्यातील कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील सदानंद नारकर यांचा उमेदवारी अर्ज छानणी अंती अवैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रमोद पुंडलिक रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र आहे.
आज छानणीच्या दिवशी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी छानणी प्रक्रियेला सुरुवात केली. गट क्रमांक १ – कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाची छानणी प्रथम झाली. यावेळी सुनील नारकर यांच्या उमेदवारी अर्जातील शपथपत्र अपूर्ण असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.
अर्ज अवैध ठरताच सुनील नारकर हे छानणीस्थळावरून तात्काळ बाहेर पडले. या निर्णयानंतर उबाठा गटात सन्नाटा पसरला असून, ही बाब पक्षासाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, छानणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुनील नारकर यांनी वाजत-गाजत मिरवणूक काढत अर्ज दाखल केला होता. त्याच कोळपे मतदारसंघातून भाजपाकडून प्रमोद रावराणे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय भाजपाकडून राजेंद्र राणे, अतुल सरवटे, अनंत फोंडके यांनीही अर्ज दाखल केले होते. तसेच जितेंद्र तळेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
उबाठा उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यानंतर कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक समीकरणे बदलली असून, भाजपासाठी ही स्थिती अनुकूल मानली जात आहे. आगामी टप्प्यात इतर अर्जांच्या स्थितीकडे आणि पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
