आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडी येथील सक्रिय कार्यकर्ते सचिन गावडे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा ‘मशाल’ हाती घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात घरवापसी केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हा पक्षप्रवेश वैभव नाईक (आमदार) यांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी सचिन गावडे यांनी माड्याची वाडीचे सरपंचपद भूषविले असून, स्थानिक पातळीवर त्यांचा सक्रिय सहभाग आणि जनसंपर्क ओळखला जातो.
या घरवापसीमुळे कुडाळ तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चा रंगल्या असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
