You are currently viewing भारती विद्यापीठाची अंतिम फेरीत धडक

भारती विद्यापीठाची अंतिम फेरीत धडक

*भारती विद्यापीठाची अंतिम फेरीत धडक*

*विश्वनाथ स्पोर्ट्स मीटः नेस वाडिया संघावर ३ गडी राखून थरारक विजय*

लोणी काळभोर :

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वनाथ क्रीडा स्पर्धा (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत बुधवारी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीच्या क्रिकेट सामन्यात भारती विद्यापीठ संघाने नेस वाडिया कॉलेजवर ३ गडी राखून रोमांचक विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना नेस वाडिया कॉलेजने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६२ धावा केल्या. संघासाठी आदित्य जी याने आक्रमक खेळी करत ५९ चेंडूंमध्ये ७ चौकार व ४ षटकारांसह ८२ धावा फटकावल्या. त्याला सिद्धांत मेमाणे याने मोलाची साथ देत २८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. उर्वरित फलंदाजांकडून मात्र फारशी साथ मिळाली नाही.
१६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारती विद्यापीठाने सकारात्मक सुरुवात केली. ओम खटावकर (३२ चेंडूंत ४८) आणि जशन सिंग (२५ चेंडूंत ३४) यांनी धावसंख्या गतीमान ठेवली. मात्र, नेस वाडियाच्या गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणली. अश्विन शिंदे याने भेदक मारा करत ४ षटकांत १९ धावांत ३ बळी घेतले, तर प्रणव लोखंडे याने २२ धावांत २ बळी मिळवत १८ षटकांअखेर भारती विद्यापीठाची अवस्था ७ बाद १३७ अशी केली.

अखेरच्या षटकांत सामना नेस वाडियाच्या बाजूने झुकलेला असताना, गौरव लंगोर याने सामन्याचा नूर पालटला. त्याने केवळ ९ चेंडूंमध्ये नाबाद २८ धावा करताना चार उत्तुंग षटकार ठोकले आणि अवघ्या ५ चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या धडाकेबाज कॅमिओमुळे भारती विद्यापीठाने अंतिम फेरी गाठली.

*संक्षिप्त धावफलक :*
उपांत्य फेरी सामना : नेस वाडिया कॉलेज – २० षटकांत १६२/६ (आदित्य जी ८२ – ५९ चेंडू, सिद्धांत मेमाणे ४० – २८ चेंडू; अभिषेक सिंह २/३३) पराभूत.वि. भारती विद्यापीठ – १९.१ षटकांत १६७/७ (ओम खटावकर ४८ – ३२ चेंडू, जशन सिंग ३४ – २५ चेंडू, गौरव लंगोर* २८ – ९ चेंडू; अश्विन शिंदे ३/१९, प्रणव लोखंडे २/२२) सामनावीरः ओम खटावकर

प्रतिक्रिया व्यक्त करा