*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवितेने पोट भरत नाही साहेब*….
*जगण्यासाठी पोटाला भाकर हवी*
अनेकांना असं वाटतं की
कविता लिहिणं सोपं असतं
कागद पेन आणि थोडी भावना
इतकंच दिसतं
पण विचारांचा भुगा करून
शब्दांची भुक भागवताना
जिवाची घालमेल मात्र कुणालाही दिसतं नाही
अरे विचारांच्या गर्भात
शब्दांनी गर्दी केली की
थोडा वेळ काढावा लागतो
कवितेचा प्रपंच कागदावर
मांडावा लागतो
शब्द फलित होतात
तेव्हा कविता जन्माला येते
तिला मायेने गोंजारले की मग
ती हळुवार काळजाला भिडते
एका कवितेसाठी किती विचार करावा लागतो
जसं सुचेल तसं लिहीतो
कवितेचाही प्रवास व्हावा यासाठी
ट्रेन पकडतो बस बदलतो
पोटात भूक,मनात कविता आणि
डोळ्यांत एकच अपेक्षा असते
पोटतिडकीने लिहलेले कविता वाचल्यावर मग…
ती कोणाच्यातरी चेहऱ्यावर दिसते
कविता सादर करताना
प्रत्येकजण मन लावून एकतो
सभागृहात टाळ्यांचा गजर होतो
कोणी खूप छान म्हणतो
कोणी व्वाह व्वा म्हणतो
तेव्हा चेहऱ्यावर हसू आणि मनात आनंदफुलतो
त्याच क्षणी कवी मोठा होतांना दिसतो
शाल अंगावर पडते
सन्मानपत्र हातात येतं
फोटो काढले जातात
काही मिनिटं रोजची मरमर विसरतो
त्यावेळचा तो प्रसंग खरचं सुंदर दिसतो
त्याक्षणी तेव्हा तो थोडं जगून घेतो
कारणं आयुष्यभर लढणाऱ्या माणसाला
एकदातरी मानसन्मान हवा असतो
मग…
कार्यक्रम संपल्यावर
माईक बंद होतो लाईट ऑफ होतो
जो तो आपापल्या घरी जातात
मनातल्या मनात कविता गुणगुणतात
मात्र कवी पुन्हा त्याच आयुष्यात
रोजच्या जगण्याच्या वाटेवर परत येतो
घरी परतल्यावर
खिशात सन्मानचिन्ह असतं
त्याच कुणाला काहीच महत्त्व नसतं
शोकेशमधे ते छान शोभून दिसतं
कवी फक्त बघत असतो
भूकेला गाठमारू पुन्हा नव्याने
नविन काहीतरी लिहीत असतो
एक कविता वाचण्यासाठी
एक दिवसाची धावपळ असते
उरलेल्या दिवसात
भाकरीसाठीची मरमर दिसते
पुन्हा तेच जगणं तीच तडजोड
नसंपणाऱ्या धावपळीत
उसंत कधीच मिळत नसते
पण कवितेने पोट भरत नाही साहेब
जगण्यासाठी पोटाला भाकर हवी असते
छंद जोपासता येतो पण…
भाकरीचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो
पोटाला जेव्हा
भूकेच्या वेदनांची कळ लागते ना
तेव्हा कविता जन्माला येते
म्हणून भुकेपुढे कोणतीही कविता
उभी राहू शकत नाही साहेब...
कारणं….
कविचं जगणं म्हणजे
स्वप्न आणि वास्तवाच्या
दोन टोकांवर चालणं
एका टोकाला सन्मान
दुसऱ्या टोकाला भूक
अणि मध्ये
न थांबणारी धावपळ
जिवाची घालमेल रोजची मरमर
हेच त्याचं जगणं हेच त्याच नशीब
आणि हेच सत्य
कविता लिहिता येते साहेब….
पण जगण्यासाठी पोटाला भाकर हवी
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८
