मालवणात भाजपला मोठा धक्का :
पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातील 26 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
मालवण :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना महायुतीत भाजपच्या वाट्याला कमी जागा मिळाल्याने मालवण तालुक्यात भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या नाराजीचा उद्रेक पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघात झाला असून भारतीय जनता पार्टीच्या तब्बल 26 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर यांच्या माध्यमातून भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वी ओरोस मंडलमधील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्याच धर्तीवर आता पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी संघटनेपासून फारकत घेतल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद प्रभारी (पेंडूर) सतीश अंकुश वाईरकर, तालुका उपाध्यक्ष जगदीश सु. चव्हाण, तालुका सरचिटणीस मिलिंद मारुती चव्हाण, पेंडूर पंचायत समिती प्रभारी चंद्रशेखर आत्माराम फोडेकर, शक्ती केंद्रप्रमुख संदीप बाळकृष्ण सरमळकर, बूथ अध्यक्ष सत्यवान बाळकृष्ण पाटील यांच्यासह विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या एकूण 26 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये अनुसूचित जाती मोर्चा, पंचायत समिती प्रभारी, तसेच सोशल मीडिया प्रमुखांचाही समावेश आहे.
महायुतीच्या जागावाटपामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे या राजीनाम्यांतून स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे मालवण तालुक्यात भाजपसमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. पुढील काळात पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
