रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्बी हंगाममध्ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्लक असल्याकारणाने शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वार ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या रब्बी पिकांची नोंदणी दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, खरीप व रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.
तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील. तरी सर्व शेतकरी बांधवांनी, रब्बी 2025 ची पीक पाहणी दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
