You are currently viewing शिशिर ऋतू…माझ्या कवितेचे भावविश्व

शिशिर ऋतू…माझ्या कवितेचे भावविश्व

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम कथा..कविता*

 

*शिशिर ऋतू…माझ्या कवितेचे भावविश्व*

 

शिशिर ऋतूचे वर्णन करणारी कथा लिहिताना मला एक कविता अगोदर सुचली ती अगोदर देते.तिचे भावविश्व उलगडताना व तुम्ही वाचल्यानंतर या कथेचा उलगडा वाचकांना होईलच. कवितेचे शीर्षक आहे,

 

*”चाहूल गुलाबी थंडीची”!…*

 

 

तिचे पदन्यास अंगणी पडताच,

गार वारे वाहू लागतात

क्षण रोम-रोम प्रेमी युगुलांचे

देहावर शहारे येतात…!

गोड छेड वाराही काढतो

अन बन वेळूचे थरारते,

मंद-मंद लहरत झुळकींनी

आरक्त लाजरे होते..

नवथर,नाजूक क्षण घेऊन मग

ऐन हंगामात ती येते,

सुख..क्षणभर ओले मग

आल्हादात न्हाउनी निघते..

वेल नाजूकशी लाजाळूची,

घाई तिलाही होई स्पर्शाची

गती वाढूनी मग स्पंदनास त्या

होते लगबग मिटण्याची…

अधरावरची लालीही मग

हळूच! अशी ओठांवर येते

अन् चाहूल गुलाबी थंडीची

निसर्ग किमया करते…….!!

 

बालपणापासून मी नैसर्गिक वातावरणात,एकत्र कुटुंबात वाढलेली असल्यामुळे मला निसर्गाचे खूप आकर्षण आणि वेड आहे.त्यातूनच शिशिर ऋतूच्या आगमनात गावी गेलेली असताना एका संध्याकाळी बालमैत्रिणींसोबत तिच्या घरामागच्या बागेत बसलेलो असताना मला जाणवलेल्या शांत,चिंतनशील अवस्थेत गार वारा सुटला त्याचवेळी माझ्या कवीमनाने मनात या कवितेच्या कल्पनेने भरारी घेतली व शब्दांनीही प्रतिसाद देत ही कविता मुक्तछंदात मांडून झाली.

 

“चाहूल गुलाबी थंडीची…!” ही कविता मुळात निसर्गाच्या कोवळ्या, लालित्यपूर्ण बदलांची अनुभूती देत असताना मानवी मनातील कोमल भावस्पंदनांशी एकरूप होते. गुलाबी थंडी म्हणजे शिशिराच्या सुरुवातीचे नाजूक, गार, सुखद स्पर्श असलेले ऋतूमान. या गुलाबी थंडीचा प्रत्येक स्पर्श येथे केवळ ऋतूचे वर्णन न राहता, एका प्रेमी मनाच्या हळुवार जागृत होणाऱ्या भावविश्वाशी जोडला जातो. त्यामुळे हेच कवितेचे वैशिष्ट्य, म्हणजे निसर्ग आणि मानवी भावनांचे एकत्रित लयबद्ध चित्रण असे म्हणायला हरकत नाही.

 

कवितेच्या पहिल्याच ओळीपासून मन निसर्गाच्या सौंदर्यदृष्टीकडे वळते.

 

“तिचे पदन्यास अंगणी पडताच,

गार वारे वाहू लागतात…”

येथे “तिचे पदन्यास” हा शब्दप्रयोग अत्यंत सूक्ष्म आणि भावगर्भ आहे. थंडीचे आगमन हे ‘स्त्री-स्वरूप’ दिलेल्या रूपकात्मक शैलीत दाखवले आहे. निसर्गाच्या प्रत्येक बदलाला मी मानवी अनुभूतीचा साज चढवण्याचा प्रयत्न केला आहे. जणू काही थंडी ही एक प्रेमळ, अदृश्य, नाजूक स्त्री आहे जिने घराच्या अंगणात पाऊल टाकले आणि वातावरणच बदलले..!

 

गार वाऱ्याचा स्पर्श रोम-रोमात थरार निर्माण करतो, आणि मी ही अनुभूती “प्रेमी युगुलांचे… शहारे येतात” अशा रूपकातून व्यक्त करते. येथे शहारा हा केवळ शारीरिक स्पर्शाचा परिणाम नसून भावनिक स्पंदनांचा कंप आहे. प्रेमाची ऊर्मी आणि थंडीचे कोवळेपण एकत्रितपणे शरीर आणि मनात एक हळवी, प्रेमाची लय निर्माण करतात.

 

“गोड छेड वाराही काढतो” वारा येथे एक दंगेखोर प्रियकर बनतो. तो प्रेमी युगुलांच्या मौनातही आपल्या निरागस खोडकर स्पर्शांनी चैतन्य घालतो. निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये कवीने मानवी हळुवार भावना जागृत केल्या आहेत.

 

त्यानंतर, “बन वेळूचे थरारते”, “आरक्त लाजरे” अशा प्रतिमा आपल्याला दृश्यात्मक अनुभव देतील. वाऱ्याशी खेळणाऱ्या वेळूच्या पानांचा थरथराट असो वा गुलाबी थंडीत लालसर झालेली फुले असो प्रत्येक वस्तू प्रेमाच्या नवचैतन्याने भारलेली दिसते. या प्रतिमांमध्ये शृंगाररसाचा सौंदर्यपूर्ण, मात्र सुसंस्कृत आविष्कार दिसतो.

 

ऋतूंच्या वार्षिक चक्रातील महत्त्वाकडे आपले लक्ष वेधते-

“नवथर, नाजूक क्षण घेऊन मग

ऐन हंगामात ती येते…”

थंडीचे आगमन अचानक नाही, ते नव्या अनुभवांची पेटी घेऊन येते. जणू प्रत्येक वर्षी हा ऋतू मनाला नव्याने सौंदर्य पाहायला शिकवतो. “नाजूक क्षण” हा शब्दप्रयोग मनातील नाजूक भावना, कोवळी प्रेमभावना, आणि निसर्गातील नाजूक ढंग यांचा सुंदर संगम घडवतो असे मला सांगायचे आहे.

 

“सुख…क्षणभर ओले मग

आल्हादात न्हाउनी निघते…”

 

येथे ‘ओले सुख’ हा शब्दप्रयोग नितांत नाविन्यपूर्ण केला आहे. गार वाऱ्याच्या स्पर्शाने, धुक्याच्या ओलाव्याने, आणि प्रेमभावनेच्या उत्कटतेने तयार होणारे हे ‘ओले सुख’ मानवी मनाचे, प्रेमाचे, आणि निसर्गाचे त्रिवेणी संगम आहे. यालाच मी निसर्गातील ओलसर सौंदर्याला भावनांच्या ओलसर उबेशी अतिशय संवेदनशील रीतीने मी जुळवले आहे.

 

निसर्गातील झाडे, वेली, पानाफुलांचे उल्लेख केवळ वर्णन म्हणून येत नाहीत तर ती मानवी भावनांचे प्रतीक बनतात.

 

“वेल नाजूकशी लाजाळूची,

घाई तिलाही होई स्पर्शाची…”

 

लाजाळूची वेल स्पर्शाने गोळा होणारी! तिच्या या स्वभावाचा उपयोग मी प्रेमाच्या आकांक्षांना रूप देण्यासाठी केला आहे. जशी लाजाळूला स्पर्शाची ओढ असते तशीच प्रेमी हृदयांना जवळ येण्याची उत्सुकता असते. निसर्गातील सूक्ष्म हालचाली, वाऱ्याचे स्पंदन, आणि ऋतूंचा बदल सगळे मानवी भावनांच्या प्रवाहाशी एकरूप होत जातात.

 

“गती वाढूनी मग स्पंदनास त्या

होते लगबग मिटण्याची…”

येथे स्पंदन म्हणजेच हृदयाची धडधड, मनाची धुसफूस, आणि भावनांची लयबद्धता. ऋतूमानातील गती मानवी भावनांचीही गती वाढवते.

 

शेवटच्या कडव्यात मी कवितेचे सौंदर्य अत्युच्च पातळीवर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे तो असा की,

 

“अधरावरची लालीही मग

हळूच! अशी ओठांवर येते

अन् चाहूल गुलाबी थंडीची

निसर्ग किमया करते…!!”

 

अधरावरील लाली हा थंडीचा परिणाम असतानाही तो प्रेमभावनेच्या उगमाशी जोडला गेला आहे. निसर्ग ‘किमया’ करतो म्हणजेच निसर्ग केवळ दृश्यरूप बदलत नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात एक जादुई स्पंदन जागवत राहतो.

 

ही कविता शिशिराच्या गुलाबी स्पर्शातून निर्माण होणाऱ्या प्रेमभावना, निसर्गातील सौंदर्य,आणि मानवी अंतर्मनातील सूक्ष्म थरथरीचे अतिशय हळुवार पण प्रभावी चित्रण करते. म्हणूनच मी ही कविता मुक्तछंदात करून माझ्या भावविश्वाला मुक्तपणे अधिक सहज आणि नैसर्गिकपणे मांडू शकले. रूपक, मानवीकरण, सूक्ष्म प्रतिमा आणि भावलालित्य ही कवितेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत असे मला वाटते.

 

थंडीच्या आगमनाचा विषय जरी साधा भासला तरी कवितेतून तो प्रेम, आल्हाद, निसर्गसौंदर्य आणि अंतरंगातील कोमल स्पंदने यांचे सुंदर रूपक, बनतो. त्यामुळे ही कविता केवळ ऋतूवर्णन न राहता, मनाच्या कोमल ऋतूची अनुभूती देते.

 

माझ्या कवितेतील विशेष भावलेली एक ओळ निवडायची झाली तर ती म्हणजे,

“सुख…क्षणभर ओले मग

आल्हादात न्हाउनी निघते…”

 

ही ओळ का विशेष भावली तर

यात प्रतिमांची कोमलता

“ओले सुख” हा शब्दप्रयोग अत्यंत नाजूक, भावगर्भ आणि नाविन्यपूर्ण आहे. थंडीतील धुक्याचा ओलावा, मनातील प्रेमाची ऊब, आणि वातावरणातील आनंद हे तिन्ही एकाच क्षणात “ओले सुख” या प्रतिमेत सामावतात.

 

निसर्ग आणि भावनांचा संगम-

‘सुख न्हाउनी निघते’ ही कल्पना निसर्गातील ओलसरता आणि मनातील आल्हाद यांना एकत्र करून टाकते. जणू निसर्गच भावनांना स्पर्शून जातो.

 

शब्दांच्या साधेपणात दडलेले गहिरे भाव अवघ्या काही शब्दांत इतका अनुभवसंपन्न भाव व्यक्त करणे हे मलाच काय कोणत्याही संवेदनशील कवयित्रीच्या शब्दांतील घडण व संवेदनशीलतेचे लक्षण आहे.

 

थंडीतली पहाटेची वेळी जेव्हा धुक्याची हलकी चादर वातावरणात असते, गारवा ओलावा घेऊन शरीरावर स्पर्शतो, आणि मनातही एक अनामिक आनंद जागतो.घराच्या अंगणात, बागेत किंवा एखाद्या शांत, हिरव्या मोकळ्या जागेत, जिथे वाऱ्याची झुळूक आणि थंडीचा गुलाबी स्पर्श मनाला प्रत्यक्ष अनुभवता येतो.त्या क्षणी निसर्गातील ओलसर थंडी आणि मनातील कोवळे भाव एकत्र येतात, आणि अगदी तसाच अनुभव या ओळीत उतरतो-

“सुख ओले… आल्हादात न्हाउनी निघते.”

 

या कवितेतील मला अजून विशेष भावलेली ओळ म्हणजे,

 

“अधरावरची लालीही मग

हळूच! अशी ओठांवर येते…”

 

अत्यंत नाजूक आहे. थंडीचा कोवळा स्पर्श आणि अंतर्मनातील हुरहूर या दोन्हींचा संगम ‘लाली’ या शब्दात उमलतो.

ही “लाली” म्हणजे केवळ थंडीचा परिणाम नाही… तर लाज, हुरहूर, आनंद, आणि प्रेमभावनेचा कोवळेपणा यांचे सुंदर प्रतीक आहे.

निसर्गातील आणि मनातील सौंदर्याचा एकसंध मिलाफ, थंडीमुळे येणारी गुलाबी छटा, आणि मनातील भावस्पर्शाने येणारी लाली दोन्ही इतक्या सहजतेने एकत्र केलेल्या दिसतात की या ओळी वेगळाच अनुभव देतात.

 

शब्दांची मितव्ययिता आणि भावांची अफाट उंची समजण्यासाठी मी,

“हळूच! अशी…” – या दोन शब्दांत ज्या नाजूकपणाने भाव रेखाटला आहे, तो अत्यंत प्रभावी वाटावा व निसर्ग

सौंदर्यातून भावांचे चित्रण करण्याचे सामर्थ्य खास दिसावे यासाठी.

 

संध्याकाळी किंवा थंड सकाळी, जेव्हा हवेत गुलाबी गारवा असतो, आणि चेहऱ्यावर थंडीचा कोवळा स्पर्श लाली आणतो.एखाद्या गार झुळुकीच्या बागेत, माळरानावर, घराच्या छतावर, किंवा एखाद्या अशा जागी जिथे आपण थोडे शांत, चिंतनशील अवस्थेत असतो.अशा क्षणी निसर्ग आपल्याला हळूच स्पर्शतो… आणि मनही त्याला सौम्य प्रतिसाद देत “लाली” उमटवत असते आणि चाहूल गुलाबी थंडीची निसर्ग किमया करते.म्हणूनच मला ही कविता खूप भावते व वेगळी वाटते.

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा