*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित पुस्तक काव्यरचना*
*अनंताचे सांत्वन*
हे करुणाकरा, तू देतोस मणभर सुख..
पण.., तूच दिलेलं क्षणभर दुःख मन हेलावून सोडतं
जन्म तूच दिलास अन् आयुष्याचं हिरवं पान देखील..
मरण तुझ्याच इच्छेने तर क्षणात कवटाळतं
तूच दिलंस तरी मी म्हणतो रे “कष्टाचं फळ मिळालं…”
अन् कधी तू झिडकारलंस की खेदाने बोलतो..,
“काय पाप केलं होतं ज्याचं तू असं फळ दिलं?”
देणं आणि घेणं दोन्ही तर तुझ्याच लीला
मग का लावावा लाडू, मोदक, पेढे अर्पण करून वशिला?
बुद्धिदाता, तू दिलेल्या बुद्धीमुळेच तर आम्हा सारं कळतं
पण.., अमंगल घडलं की मन नकळत भरकटतं..
तूच निर्मित फुल सुद्धा ते अर्पण करण्याचं टाळतं
रागे रागे तुला शेंदूर फासलेला दगड म्हणून मोकळं होतं
निराशेपोटी काहीमाही बरळतं…
कितीही नावे ठेवली तरी तुझ्या चरणांशी शरण येतं
कधी चंदनाची उटी कधी दूध दह्यानं न्हाऊ घालतं
कोष्णोदक अन् शीतल जलाभिषेक करतं
रेशमी वस्त्राने पुसून पुन्हा मनमंदिरी बसवतं..
खरंय, माणूस देवाकडे सुद्धा खोटेपणा करतो..
स्वार्थ साधला की, मायबाप, देवाला सुद्धा विसरतो
तरीही तो, तुला अंतरीतून मानतो…
आता फक्त एक कर…
माणसा माणसात त्याला तुला पहायला शिकव
अन् आईबापाच्या रूपात तुझं अस्तित्व टिकव..
✒️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६
