You are currently viewing सावंतवाडी दैवज्ञ गणपती मंदिराच्या अध्यक्षपदी संतोष चोडणकर यांची एकमताने निवड

सावंतवाडी दैवज्ञ गणपती मंदिराच्या अध्यक्षपदी संतोष चोडणकर यांची एकमताने निवड

सावंतवाडी दैवज्ञ गणपती मंदिराच्या अध्यक्षपदी संतोष चोडणकर यांची एकमताने निवड

सावंतवाडी :

येथील दैवज्ञ गणपती मंदिरात शुक्रवार, दि. 9 जानेवारी 2026 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेत एकमताने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी श्री. संतोष वसंत चोडणकर, उपाध्यक्षपदी शिवशंकर नेरुरकर, सचिवपदी गौरव कारेकर तर खजिनदारपदी सुहास चिंदरकर यांची निवड करण्यात आली.
या सभेत येत्या नवीन वर्षात साजरे होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच मागील व चालू वर्षात शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व पुरस्कार प्राप्त दैवज्ञ समाजातील व्यक्तींचा सत्कार करण्याचा ठराव नव्या कार्यकारिणीच्या वतीने मंजूर करण्यात आला.
सभेत सुवर्ण व्यवसायातील अडचणी, भविष्यातील फायदे-तोटे यावर सखोल चर्चा झाली. समाजातील ऐक्य टिकवण्यासाठी भविष्यात स्नेहमेळावे तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. सुवर्ण व्यवसायात होत असलेल्या बदलांचा विचार करून सुवर्ण कारागिरांसाठी आधुनिक डिझाइन्स तयार करण्याच्या कार्यशाळा घेणे, तसेच समाजातील युवकांना प्रोत्साहन देऊन नवीन सुवर्ण कारागीर घडवणे यावरही चर्चा करण्यात आली.
महिला, युवक व युवतींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे सुवर्ण कारागिरांवर येणाऱ्या आर्थिक अडचणींबाबत उपाययोजनांवरही विचारमंथन झाले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी सुवर्ण व्यावसायिकांनी नवनवीन डिझाइन्सचे प्रशिक्षण घ्यावे, तसेच नवतरुणांनी नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळून रोजगारनिर्मिती करावी, असे आवाहन अध्यक्ष संतोष चोडणकर यांनी केले. यासाठी लवकरच युवक व कारागिरांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश पनवेलकर तसेच जुन्या कार्यकारिणीच्या सदस्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सभेस सावंतवाडी शहरातील दैवज्ञ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा