You are currently viewing माझा धर्म – हिंदू धर्म

माझा धर्म – हिंदू धर्म

*काव्यप्रेमी महाराष्ट्र समूहाचे सन्मा.सदस्य लेखक कवी अनंत शिंदे लिखित अप्रतिम लेख*

 

*माझा धर्म – हिंदू धर्म*

 

धर्मो हि तेषामधिको विशेषः धर्मेण हीना पशुभिः समानाः” (मनुष्याला धर्म नसेल तर तो पशूसमान आहे).

 

माझा धर्म हिंदू आहे. अर्थात् तो मला जन्माने मिळाला आहे. मला जसा माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे तसेच इतर धर्मांचा मी आदर करतो. कारण ती माझ्या धर्माची शिकवण आहे.

 

आजच्या जगातील लोकसंख्या ही तीन प्रमुख धर्मांमध्ये विभागली गेली आहे., ख्रिश्चन धर्म, इस्लाम आणि हिंदू धर्म. तसे पाहिले तर बौद्ध धर्मियांची संख्या सुध्दा मोठी आहे. परंतु बौध्द, जैन आणि शिख हे स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माच्याच तीन शाखा आहेत. उत्तरे कडून आपल्या देशावर मुस्लिम धर्मीयांच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी मूळ हिंदू असलेल्या लोकांनी शस्त्रे हाती घेऊन देशातील जनतेचे रक्षण केले आणि शिख धर्म उदयास आला. बौद्ध आणि जैन धर्म दोन्ही भारतीय श्रमण परंपरांमधून आले आहेत, जे अहिंसा, आत्म-नियंत्रण आणि कर्मावर आधारित मुक्तीवर भर देतात. तसे पाहिले तर सर्वच धर्मामध्ये अहिंसा मान्य आहे.,पण जैन धर्म अहिंसेला अत्यंत कठोरपणे पाळतो. हिंदू धर्मातील तत्वज्ञाना प्रमाणेच जैन धर्म सुद्धा आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल खात्री देतो. हे दोन्ही धर्म असे मानतात की दुःख हे तृष्णेमुळे होते आणि अष्टांगिक मार्गाने त्यावर मात करता येते.

 

हिंदू या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली ते पाहू. पर्शियन लोक सिंधूचा उच्चार हिंदू असा करीत; कारण पर्शियन भाषेतील ‘स’ ह्या अक्षराचा अभाव आहे. तर काहींच्या मते, हिंदू हा शब्द सिंधू शब्दापेक्षाही प्राचीन आहे.

 

हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म आहे, अनेक विद्वानांच्या मते हिंदू धर्मातील चालीरीती चार हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. हिंदू हा फक्त एक धर्म नसून मानवाने आयुष्य कसे जगावे याची शिकवण देणारी विश्वव्यापी संस्था आहे.

 

हिंदू धर्माचा कोणताही एक ग्रंथ नसून वेद हे सर्वात प्राचीन आणि प्रमुख धर्मग्रंथ आहेत, ज्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचा समावेश होतो. यासोबतच उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. वेदांना ‘श्रुती’ म्हणतात, तर इतर ग्रंथांना ‘स्मृती’ म्हणतात, आणि या सर्वांमध्ये हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, ज्ञान आणि आचारसंहिता आढळते.

 

हिंदू धर्माची स्वतःची अशी कोणतीही एक ‘आचारसंहिता’ नसली तरी, धर्म म्हणजे कर्तव्य आणि नैतिकता, अर्थ म्हणजे जीवन जगण्यासाठी असणारी समृद्धी, काम अर्थात् आनंद आणि मोक्ष म्हणजे मुक्ती ही चार पुरुषार्थ जीवनाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या तत्वांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी, लांडी लबाडी न करणे यांसारख्या नैतिक मूल्यांचा समावेश आहे. यामुळेच व्यक्ती आणि समाजाला धर्माचरणातून परमार्थ साधता येतो.

 

हिंदू धर्माचा कोणी एक संस्थापक नाही, कारण तो हजारो वर्षांपासून विकसित झालेला विविध परंपरा, श्रद्धा आणि तत्त्वज्ञानांचा संगम आहे, ज्याला अनेकदा “सनातन धर्म” (शाश्वत धर्म) म्हटले जाते, ज्याचा उगम ब्रह्मदेव स्वतः आहे आणि याचे शिक्षक ब्रह्मा, विष्णू, शिव असे मानले जातात. जीवसृष्टीची उत्पत्ती, तिचे संरक्षण आणि संवर्धन आणि नियमानुसार नष्ट करणे किंवा संहार करणे ही तीन कार्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश किंवा महादेव यांची आहेत असे मानले जाते. हा धर्म विशिष्ट व्यक्तीने सुरू केला नसून, ऋषीमुनींचे योगदान आणि सिंधू संस्कृतीपासून त्याचा विकास झाला आहे.

हिंदू धर्माला येशू, बुद्ध किंवा मोहम्मद पैगंबर यांच्यासारखा कोणताही एक संस्थापक नाही.

याला ‘सनातन धर्म’म्हणतात, कारण तो शाश्वत आहे आणि त्याचा उगम अनादी आहे.

यात विविध विचार आणि उपासना पद्धतींचा समावेश आहे.

 

हिंदू धर्म ही एका व्यक्तीची निर्मिती नसून, भारतीयर संस्कृती आणि परंपरांच्या हजारो वर्षांच्या प्रवासातून निर्माण झालेला एक विशाल आणि वैविध्यपूर्ण धर्म आहे.

 

हिंदू धर्मातील आचारसंहिता म्हणजे धर्माचे म्हणजेच नैतिक मूल्यांचे पालन करणे होय. कारण तेच सुदृढ समाजासाठी आवश्यक आहे.

हिंदू धर्मात अनेक पंथ, उपपंथ, जाती, पोटजाती आहेत. वेगवेगळ्या काळातील ऋषी मुनींनी लोकांना मुळ तत्त्वानुसार कसे आचरण ठेवावे याचे तत्वज्ञान शिकविले. त्यामुळे असे वेगवेगळे पंथ निर्माण झाले. परंतु सर्व पंथाचे मूळ हे हिंदू धर्मातील तत्वज्ञानाशी सुसंगत आहे.

 

हिंदू धर्मिय लोक विशाल मनाचे आहेत. ते कोणत्याही धर्माचा तिरस्कार करीत नाहीत. इतर धर्मातील शासक, उपासक, अनुयायी यांनी लोकांचे धर्म परिवर्तन केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. परंतु हिंदूनी आपल्या हिंदू धर्माच्या वाढीसाठी असे प्रयत्न केले नाहीत. जे जे चांगले आहे, पवित्र आहे तिथे हिंदू नतमस्तक होतात. मुंबई पुरते बोलायचे झाले तर काही ठळक उदाहरणे देता येतील. हिंदू वांद्रे येथील माऊंट मेरीच्या दर्शनाला जातात. ते *मत माऊली* म्हणतात. माऊली म्हणजे आई. ते हाजीअली च्या दर्ग्यात जाऊन भक्तिभावाने नमस्कार करतात. ते हाजीमलंगला जाऊन यात्रा किंवा उरुस मध्ये सहभागी होतात. हे केल्याने आपला हिंदू धर्म बाटेल किंवा आपल्या देवदेवतांचा कोप होईल अशी शंका मनामध्ये मुळीच येत नाही.

मूर्तीपूजा ही हिंदू धर्मातील एक विशिष्ट बाब आहे. परंतु ठराविक एका देवाचीच पूजाअर्चा करावी असा दंडक नाही. काहीजण तर देवच मानत नाहीत. ते नास्तिक असतात. परंतु त्यांचीही धर्मावर श्रद्धा असतेच. काहीजण एकाच देवाला मानतात, काही अनेक देवदेवतांची आराधना करतात. परंतु कुणीही इतर देवांचा किंवा अन्य धर्मीतील आदर्शांचा तिरस्कार, अवहेलना करीत नाहीत. म्हणूनच हिंदू धर्म हजारो वर्षे या पृथ्वीतलावर टिकून आहे आणि यापुढेही तो टिकून रहाणार आहे.

°°°°°°°°°°°°°°

 

लेखक : अनंत कृष्णा शिंदे,

शिवडी, मुंबई.

भ्रमणध्वनी: 9820164722

प्रतिक्रिया व्यक्त करा