माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालीच रणनिती; जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होणार
कणकवली :
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकही महायुती म्हणून एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी अधिकृत घोषणा माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी–सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केली.
कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, काका कुडाळकर, संजू परब आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून, त्यामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर सिंधुदुर्गमध्येही महायुतीच्या माध्यमातून विरोधकांचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून शिक्षण, आरोग्य आणि दळणवळण क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चिपी विमानतळाची विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू असून, आरोग्य सेवा सक्षमपणे कार्यरत आहेत. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले असून या विकासात विरोधकांचे कोणतेही योगदान नसल्याचा ठाम दावा खासदार नारायण राणे यांनी केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला आज किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असून, अधिकृत प्रचाराचा शुभारंभ शनिवारी सायंकाळपासून होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी निवडणुकीत महायुती शंभर टक्के यश संपादन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले की, महायुतीची निवडणूक विषयक बैठक पूर्ण झाली असून जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
