गावडे हे प्रदेशाध्यक्षांचे निकटवर्तीय; प्रमोद गावडे यांची भूमिका निर्णायक ठरणार
सावंतवाडी :
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय संदीप गावडे यांची सावंतवाडी तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महिनाभर आधीच संदीप गावडे मतदारसंघातील गावागावात जनसंपर्क वाढविल्याने ते चर्चेत आले.
दरम्यान संदीप गावडे हे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक बनल्याने या मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक उमेदवारच हवा असा सूर आवळला जात आहे. स्थानिक बारा उमेदवार इच्छुक बनल्याने, रविंद्र चव्हाण यांचे निकवर्तीय असलेले संदीप गावडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना इच्छुकांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार आहे.
दरम्यान या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यावरच संदीप गावडे यांचे या मतदारसंघातून भवितव्य अवलंबून आहे.
