You are currently viewing कणकवलीत उपनगराध्यक्षपदाची लढत आघाडीने जिंकली

कणकवलीत उपनगराध्यक्षपदाची लढत आघाडीने जिंकली

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निर्णायक मतामुळे सुशांत नाईक यांचा विजय

कणकवली :

कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे सुशांत नाईक यांनी अखेर बाजी मारली. भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात झालेल्या या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

या निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक तर भाजपकडून राकेश राणे रिंगणात होते. मतदानाच्या वेळी मोठी राजकीय ओढाताण पाहायला मिळाली. मतमोजणीनंतर भाजपचे उमेदवार राकेश राणे यांना ९ मते, तर सुशांत नाईक यांना ८ मते मिळाली. मात्र येथेच निर्णायक क्षण आला.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या दोन निर्णायक मतांमुळे चित्र पूर्णपणे बदलले आणि ही मते सुशांत नाईक यांच्या पारड्यात गेली. परिणामी, नाईक यांचा उपनगराध्यक्षपदी विजय निश्चित झाला आणि अधिकृत घोषणा करण्यात आली.

विजयाची घोषणा होताच शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कणकवली शहरात जल्लोष करत आनंद साजरा केला. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष अशी दोन्ही महत्त्वाची पदे आता आघाडीकडे आल्याने कणकवली नगरपंचायत मध्ये आघाडीची पकड अधिक मजबूत झाली आहे.

भाजपच्या प्रभावी मानल्या जाणाऱ्या राजकीय पटांगणात नगराध्यक्षांच्या निर्णायक मतांमुळे झालेला हा पराभव सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा