मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून कलमठमध्ये जनजागृतीला बळ
कणकवली :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृतीचे काम करत असताना कलमठ गावात प्रवेश करताच गावात निर्माण झालेला उत्साह सहज जाणवतो. प्रवेशद्वारावरील बॅनर्स, सजावट आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या अभियानाचे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येतात. हे अभियान सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधवा महिलांसाठी अलंकार न तोडणाऱ्या महिलांची घरपट्टी व पाणीपट्टी आयुष्यभरासाठी माफ करण्याचा निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून, तो सामाजिक न्यायाच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने कलमठ मांड येथून ग्रामपंचायतपर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर सुप्रिया मेस्त्री आणि शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे गावपातळीवर शासनाच्या योजनांची माहिती पोहोचून लोकसहभाग वाढत असल्याचे चित्र दिसून आले असून, कलमठ गावातील उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.
