राजमाता जिजाऊ जयंती व शहाजीराजे पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडीत आंतरराज्यीय वेशभूषा व निबंध स्पर्धा
सावंतवाडी
येथील मातृभूमी शिक्षण संस्थेच्या ‘शिवसंस्कार’ उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आंतरराज्यीय वेशभूषा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या चार राज्यांतील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा खुली असून ३० जानेवारीपर्यंत सहभाग नोंदवता येणार आहे.
राजमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धेसाठी स्पर्धकांनी जिजाऊसाहेबांच्या वेशभूषेत संभाषणासहित दोन मिनिटांचा व्हिडिओ तयार करून ‘शिवसंस्कार’च्या अधिकृत क्रमांकावर पाठवायचा आहे. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा नसून शिशुगटापासून खुल्या गटातील सर्वांना सहभागाची संधी आहे. व्हिडिओमध्ये कोणतेही बॅकग्राउंड म्युझिक वापरू नये, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ‘शहाजीराजे…. दक्षिणेतील कारभार’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांत होणार असून लहान गटासाठी (वय ११ ते १५ वर्षे) १ ते १,५०० शब्द, तर खुल्या गटासाठी (वय १६ वर्षांवरील) २,५०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. निबंध सुवाच्य अक्षरात लिहून ‘बी-२७७, मातृभूमी शिक्षण संस्था, सबनिसवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग – ४१६५१०’ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. निबंधासोबत स्पर्धकाचे नाव, वय, पत्ता व संपर्क क्रमांक वेगळ्या कागदावर देणे आवश्यक आहे. ही स्पर्धा ऑफलाइन स्वरूपात होणार आहे.
दोन्ही स्पर्धांसाठी ३० जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंतिम मुदत असून प्रवेश शुल्क १०० रुपये आहे. हे शुल्क संस्थेच्या दिलेल्या कोडवर भरून त्याचा स्क्रीनशॉट ९६०७८२७२९६ या क्रमांकावर पाठवायचा आहे. अधिकाधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या इतिहासाचा जागर करावा, असे आवाहन शिवसंस्कारतर्फे करण्यात आले आहे.
