You are currently viewing ‘सेलिब्रिटी गावभेट’मुळे अणावमध्ये उत्साहाचे वातावरण
Oplus_16908288

‘सेलिब्रिटी गावभेट’मुळे अणावमध्ये उत्साहाचे वातावरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासात्मक उपक्रमांचा प्रारंभ

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील अणाव गावात महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आयोजित ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

अणाव येथील श्री देव स्वयंभू रामेश्वर मंदिर परिसरात मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांनी ग्रामस्थांना अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला. उपस्थित कलाकारांनी आपल्या शैलीत संवाद साधत, विकास प्रक्रियेत लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात केवळ औपचारिक भेट न ठेवता अणाव ग्रामपंचायतीच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

गरजू रुग्णांसाठी पेशंट बँकेचे लोकार्पण, ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन, तसेच प्लास्टिकमुक्तीसाठी कापडी पिशव्यांचे अनावरण करण्यात आले. महिला बचत गटांनी उभारलेल्या स्टॉल्सना मान्यवरांनी भेट देत त्यांचे कौतुक केले.

या सोहळ्यास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच लिलाधर अणावकर यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले. अणाव ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा