You are currently viewing अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ देऊ नका – वैभव नाईक

अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ देऊ नका – वैभव नाईक

*अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ देऊ नका – वैभव नाईक*

*प्रभाग क्र. ५ च्या शिवसेना उमेदवार सौ.सुजाता पाटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजीत कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

शिवसेना आणि मनसेची युती जाहीर झाल्यापासून शिवसैनिक आणि मनसैनिक खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू आहेत.१९६० मध्ये मुंबईला वाचविण्यासाठी १०८ आंदोलकांनी हुतात्म्य पत्करले. मुंबई तोडण्याचा प्रयत्न आजही सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या हितासाठी शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत. सत्ता असली काय आणि नसली काय शिवसैनिक आणि मनसैनिक त्याच तडफेने काम करत असतात. आता मते विकत घेण्यासाठी सत्ताधारी मतदारांना पैसे देतील परंतु हे पैसे अदानीचे पैसे आहेत हे विसरू नका या सत्ताधाऱ्यांनी अदानीला मुंबई विकली आहे त्याचे हे पैसे आहेत. मुंबई ही मराठी माणसाची आहे अदानी सारख्या उद्योगपतीच्या घशात आपली मुंबई जाता नये यासाठी सुजाता पाटेकर आणि शिवसेना,मनसे ,राष्ट्रवादी युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी मुंबईकरांना केले.

मुंबई महानगरपालिका निवडणूकितील प्रभाग क्र. ५ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ.सुजाता उदेश पाटेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर प्रचार सभेत माजी आमदार वैभव नाईक यांनी मार्गदर्शन केले. या कॉर्नर प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.यावेळी दहिसर मगाठणेचे विभागप्रमुख,माजी नगरसेवक उदेश पाटेकर, श्री परब, पांडुरंग गावडे मनसे विभाग अध्यक्ष यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा