You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात वन्यहत्ती नियंत्रणासाठी वनविभाग सतर्क

दोडामार्ग तालुक्यात वन्यहत्ती नियंत्रणासाठी वनविभाग सतर्क

दोडामार्ग तालुक्यात वन्यहत्ती नियंत्रणासाठी वनविभाग सतर्क

शेतकरी व ग्रामस्थांनी घाबरू नये – सावंतवाडी वनविभागाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

  दोडामार्ग तालुक्यात कर्नाटक-दोडामार्ग सीमाभागात तब्बल 12 हत्तींचा मोठा कळप दाखल झाल्याची बातमी पसरली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाचे एक पथक तात्काळ कर्नाटक हद्दीवर दाखल झाले. तेथे त्यांना हत्तीची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. यावेळी या पथकाने तेथील स्थानिक ग्रामस्थ व स्थानिक वनकर्मचाऱ्यांशी चर्चा करून हत्तीच्या हालचालीची माहिती घेतली असता काही दिवसांपूर्वी हत्तींच्या एका कळपाचा वावर हेवनहट्टी भागात होता, त्यानंतर तो कळप बेलूर वरून दांडेलीच्या दिशेने गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दोडामार्ग तालुक्याच्या कर्नाटक हद्दीवर हत्तीचा वावर नाही तसेच सावंतवाडी वनविभाग देखील कर्नाटक हद्दीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी घाबरून जावू नये, असे आवाहन सावंतवाडी वनविभागातर्फे सर्वांना करण्यात आले आहे.

दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी प्रवीण नारायण गवस जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा संघ यांनी हत्ती संबंधी विविध मागण्यांच्या अनुषंगाने सुरु केलेले ठिय्या आंदोलन दि. 08 जानेवारी 2026 रोजी स्थगित करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत वन्यहत्तीमुळे होणारे शेतपिकांचे व फळपिकांचे नुकसान कमी करण्यासाठी वन्यहत्तींना शेती व बागायतीपासून दूर ठेवण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील सर्व वनकर्मचारी यांच्यासह हत्ती हाकारा मजूर तसेच सावंतवाडीकुडाळ व आंबोली परिक्षेत्रातील अधिकचे वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करून वन्यहत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवण्याची कार्यवाही सावंतवाडी वनविभागातर्फे सुरू आहे. याकरिता क्षेत्रीय स्तरावर सुमारे 100 पेक्षा जास्त मनुष्यबळ या कार्यवाहीत सामील आहेत.

हत्ती-मानव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागा तर्फे हत्तीचा वावर असलेल्या भागामध्ये हत्ती हाकारा मजुरांच्या मदतीने रात्र दिवस गस्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर धर्मल ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हत्तीच्या वावर असलेल्या स्थळांची माहीती मिळवून ती माहीती स्थानिक ग्रामस्थांना अलर्ट प्रणलीद्वारे (WhatsApp व Text SMS द्वारे) देण्यात येत आहे. तसेच चालू वर्षी दोडामार्ग तालुक्यातील हत्ती प्रवण भागामध्ये सायरन अलर्ट सिस्टिम बसविणे काम सुरू आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना हत्तीचा वावर मनुष्य वस्तीजवळ आढळून आल्यास सायरन द्वारे तेथील ग्रामस्थांना हत्तीच्या वावराबाबतची पूर्व कल्पना देण्यात येईल यामुळे मानव वन्यहत्ती संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील हत्तीप्रवण भागांमध्ये हत्तीमुळे झालेल्या पिक नुकसानीची तात्काळ पाहणी व नुकसान भरपाई वन विभागाकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. चालू वर्षी दोडामार्ग तालुक्यात हत्तीमुळे झालेल्या एकूण 374 प्रकरणी पिक नुकसानीबाबत नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा