You are currently viewing वैभववाडीत 63 घरेलू महिला कामगारांना प्रत्येकी 10 हजारांचा लाभ

वैभववाडीत 63 घरेलू महिला कामगारांना प्रत्येकी 10 हजारांचा लाभ

वैभववाडीत 63 घरेलू महिला कामगारांना प्रत्येकी 10 हजारांचा लाभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महिलांना आर्थिक दिलासा

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील घरेलू महिला कामगारांना आर्थिक दिलासा देणाऱ्या शासनाच्या योजनेचा पहिला टप्पा यशस्वी ठरला असून 63 पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून हा लाभ मिळाल्याची माहिती वैभववाडी भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राची तावडे यांनी दिली.
भाजपा तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, नगरसेविका सानिका रावराणे, माजी सरपंच उन्नती पावले यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
प्राची तावडे म्हणाल्या की, तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार भाजपा कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन घरेलू महिला कामगारांचे अर्ज भरून घेतले. तालुक्यातून सुमारे 700 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात निकष पूर्ण करणाऱ्या 63 महिलांना सन्माननिधीचा लाभ मिळाला आहे.
या महिलांना लवकरच गृहउपयोगी भांड्यांचा संचही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेतही वैभववाडी तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले असून मोठ्या संख्येने महिलांना त्याचा फायदा झाला आहे.
दोन्ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्या असून या योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल तालुक्यातील महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले असल्याचेही तावडे यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा