You are currently viewing घसरती नीतिमुल्ये.. चिंतेचा विषय..
Oplus_16908288

घसरती नीतिमुल्ये.. चिंतेचा विषय..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*घसरती नीतिमुल्ये.. चिंतेचा विषय..*

 

फार जुन्याकाळी भारतात गुरुकुले होती. समाजाची घडी बसलेली होती. प्रत्येक वर्ग

आपली नियत कर्मे वेळच्यावेळी करत होता.

ऋषीमुनींचे आश्रम दाट जंगलात निसर्गरम्य परिसरात होते.काही तपस्वी होते तर काही गुरु

होते. तपस्वी तपश्चर्येत मग्न असत तर गुरुंची

गुरुकुले होती. उदा. सांदिपनी ऋषी, वशिष्ट

असे. ते राजांचेही गुरु असत. राजे लोक नियमित

पणे त्यांच्या संपर्कात असत व सल्ला घेत असत.

 

अशा या गुरुकुलांमधून सर्व विद्याकलांचे शिक्षण

घेऊनच विद्यार्थी बाहेर पडत. आठव्या वर्षी उपनयन संस्कार होऊन यज्ञोपवित धारण करून

हे बटू गुरुगृही विद्यार्जनासाठी प्रवेश करत असत.

कुटुंबापासून लांब रहात गुरुगृही गुरु व गुरुपत्नी

यांच्या आज्ञा पाळत, पडेल ते काम व सेवा करत

ते विद्या ग्रहण करत असत. गुरुकुलात सर्व समान असत. ना कोणी राजा ना कोणी रंक.

एक प्रकारे समानतेची शिकवण बालपणातच

अंगात मुरत असे.उदा. कृष्ण सुदामा मैत्री. कृष्ण

तर जगनियंता होता.

 

बारा वर्षे सर्वप्रकारचे शिक्षण घेऊन मंडळी गृहस्थाश्रमात प्रवेश करत असत. एक विशिष्ट

प्रकारची नैतिकता मुलांच्या अंगी नकळत मुरत

असे.राजेशाहीचे काही कडक कायदे असत. जनता त्यांचे पालन करत असे.ही व्यवस्था इतकी पक्की होती की, शतके उलटली तरी चालू

होती.

 

हळू हळू परकिय आक्रमणे सुरु झाली नि पहिला

हादरा समाजाला बसला. मोगली सत्तेने नाड्या आवळल्या व सर्वत्र अनागोंदी सुरु झाली. धर्मांतरे

झाली. समाज भेदरला, विस्कळीत झाला. डच, पोर्तुगीज, फ्रेंच, व इंग्रज यांनी पद्धतशीरपणे आपले हातपाय पसरले. शेवटी टिकले ते इंग्रज.

फार चिवट जमात. विरुद्ध हवामानात झगडणारी,

सत्तापिपासू, क्रूर साम्राज्यवादी. सामदामदंडभेद

सारे वापरून हिंदुस्तान कब्जात घेणारी.

 

लॅार्ड मेकॅाले भारतात आला. त्याने भारतीय गुरूकुलांचा अभ्यास केला. त्याच्या लक्षात आले

की भारतीयांची सारी अस्मिता या गुरुकुलात आहे.ही उत्तम शिक्षणव्यवस्था जोवर भारतात आहे तो पर्यंत ब्रिटिशांसाठी राबणारे गुलाम तयार

होणार नाहीत. कारकून तयार होणार नाहीत. ही

शिक्षणव्यवस्थाच आधी मोडीत काढली पाहिजे नि त्याने आपल्या अधिकारात ते काम हाती घेऊन भारतातील सारी गुरुकुले मोडीत काढली

व ही उत्तम व्यवस्था संपली. त्याने मग इंग्रजी

शाळा काढल्या. ब्रिटिशांसाठी नोकरशाही निर्माण करणाऱ्या. लोक मॅट्रीक होऊन कारकून

बनू लागले. पूर्ण मानसिकता बदलणारी ही व्यवस्था होती. अडाणी जनता तर ब्रिटिश राजवटीवर खूष होती. काठीला सोने बांधून फिरता येत असे, असे म्हणतात.अनेक आंदोलने

होऊन व रक्त सांडूनही १५० वर्षे स्वातंत्र्यासाठी

झगडावे लागले.

 

स्वातंत्र्यानंतरही परिस्थिती बरी होती. संस्कार टिकून होते. समाजयंत्रणा फारशी बिघडलेली नव्हती. समाजसुधारणेचे वारे फोफावले ते ही

बरोबरच होते. सारेच नीतिमान होते अशातला भाग नाही, टिळक जन्म घेतात तसे शकुनीही जन्माला येतातंच. तो सृष्टीचा नियम आहे. मिठाचा खडा लागतोच.

पण नव्या उपकरणांमुळे अशी काही क्रांती झाली की सारे जगच ढवळून निघाले. टी व्ही

व मोबाईलचा यात जास्त वाटा आहे. टी व्ही मुळे

जगच घरात आले. सिनेमात होणारे लग्न आता थेट खेड्यात होऊ लागले. संस्कार जाऊन बेगडी

पणाने, देखाव्याने समाजमनात शिरकाव केला.

इंग्लंड, अमेरिका थेट मोबाईलमध्ये हातातच आले. तिथले कल्चर, विस्कळीत, बंधने नसलेली

बेबंद लग्न संस्था. लग्न न करताच एकत्र आयुष्य

काढणे, घटस्फोट सारे नजरेच्या टप्यात आले.

शिस्त निर्माण व्हायला वर्षे लागतात पण बेशिस्त

एका क्षणात निर्माण होते.

 

इतकी वर्षे घट्ट असलेल्या आपल्या लग्न संस्थेला

प्रचंड हादरे बसू लागले व युरोपचे अनुकरण व्हायला लागले. एकपत्नी व्रत, विवाह संस्कार

सारेच धुळीला मिळाले. ग्लोबलायझशन (वैश्विकता)मुळे जग

इतके जवळ आले की, कल्पनाही करता येत नाही. नीतिमत्ता नावाची काही गोष्ट असते याचा

विसर पडून बेबंद वागण्याचे पेवच फुटले जणू.

नव्या नोकऱ्यांमुळे लाखोंचे पॅकेज आले व तरुण

तरुणी आकाशात उडायला लागले. पैसा हेच एक ध्येय बनले व अनाचाराला उत आला. आता

तर साऱ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत.घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. कुठल्या

खडकावर आदळणार आहे आपली ही नाव?

 

मला तर परिस्थिती खूप गंभीर दिसते आहे. अशा या बेफाम तरुणांवर संस्कार करायचे कसे?

त्यांना शिकवण द्यायची कशी? ते ऐकण्याच्या

मनस्थितीत तरी आहेत का? ते मुळीच ऐकणार

नाहीत कारण त्यांच्या हाती आता इतका पैसा आला आहे की, आम्ही सर्वज्ञ आहोत असा भ्रम होऊन त्यांना स्वर्ग दोन बोटे उरला आहे. अशांना

आपण कसे घडवणार आहोत. त्यातून मराठी शाळा ज्यातून थोडेफार संस्कार होत होते त्या तर

इतिहासजमा होत आहेत. आम्ही शिक्षकांना आदराने संबोधत होतो. इंग्रजी माध्यमाची मुले

“ ती टीचर आली” म्हणतात. कसले हे संस्कार.

मी तर फार निराश व चिंतेत आहे, आणखी पाचच

वर्षांनी काय काय बघायला मिळेल. त्यातून हे

अंधश्रद्ध धर्मांध धर्मांतराचे वेड जगाला कुठे घेऊन जाईल माहित नाही.

 

अशा परिस्थितीत नवी सुसंस्कारीत पिढी घडवायची कशी? माझ्याजवळ तरी उत्तर नाही.

तुमच्या जवळ काही जादूची कांडी असेल तर

अवश्य सांगावी. जी नवा समाज घडवेल. मला तरी गोष्टी फारच हाताबाहेर गेलेल्या दिसताहेत.

चित्र भेसूर आहे. हाती काहीच नाही म्हणून गप्प

बसणे नशिबी आले आहे. इतकी अस्वस्थता तर

या पूर्वी कधीच वाटली नव्हती. म्हणून मी हा विषय दिला जो रोज मन शरीर पोखरतो आहे.

 

ही सारी माझी मते आहेत नि कुणीही सहमत

होण्याची माझी अपेक्षा नाही.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा