You are currently viewing मनतरंग”मानवी संवेदना तरल करणारी वास्तव घटनांवर आधारित साहित्यकृती” ….अँड.नकुल पार्सॅकर….

मनतरंग”मानवी संवेदना तरल करणारी वास्तव घटनांवर आधारित साहित्यकृती” ….अँड.नकुल पार्सॅकर….

“मनतरंग”मानवी संवेदना तरल करणारी वास्तव घटनांवर आधारित साहित्यकृती”
….अँड.नकुल पार्सॅकर….

माझ्या दादल्यानं माका सांगले,” उज्ज्वला तुझ्या डायरेत तुयेंन जे बरयला तेचे बरे एक पुस्तक व्हतले” हे संभाषण आहे जेष्ठ व श्रेष्ठ पञकार,लेखक संजय ढवळीकर आणि पुणे येथील स्टेट बँकेत उपव्यस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या मनतरंग या पहिल्या वहिल्या पुस्तकाच्या लेखिका सौ.उज्ज्वला ढवळीकर या दांपत्यामधले.
लहानपणापासून ते आतापर्यंत प्रवासात किंवा ठिकाणी ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनांच्या नोंदी लेखकेने आपल्या डायरीत ठेवलेल्या होत्या. अर्थात या सगळ्या वास्तव घटना होत्या.डायरी म्हटल्यावर आठवते ती हवाला प्रकरणातील जैन डायरी,ज्या डायरीमुळे तत्त्वनिष्ठ राजकारण करणाऱ्यां बिचार्‍या मा.लालकृष्ण अडवाणींना राजीनामा द्यावा लागला होता.ते जेव्हा निर्दोष सुटले तेव्हा त्यानी सन्मानाने संसदेत पाय ठेवला.आता डायरीचा जमाना गेला आता जेफरी एपस्टीन फाईल्सचा जमाना आहे.फरक एवढाच डायरीतील नोंदी शाबूत रहातात आणि फाईल्स करप्ट होतात.आमच्या उज्ज्वला ताईंची ही एक अशी डायरी आहे ज्यामध्ये मानवी भावभावनांचा अविष्कार आहे.सचेत मानवी मनाचा साक्षात्कार आहे.
आमचे पञकार मित्र श्री संजय ढवळीकर यानी मला सप्रेम भेट म्हणून दिलेले पुस्तक आज मी वेळात वेळ काढून वाचले.रहावलं नाही त्यामुळे त्या सुंदर अशा साहित्यकृतींवर व्यक्त होण्याचा एक वाचक म्हणून प्रयत्न. मी कुणी प्रतिभावंत साहित्यिक किंवा समीक्षक नाही.आदरणीय पद्मश्री मधुभाई व स्व.भागवत सर व स्व.भागवत बाई यांच्या प्रेरणेतून आणि सहवासामुळे पांढऱ्यावर काळे करण्याची थोडीफार आवड असल्याने प्रयत्न करतोय.
या पुस्तकात एकुण अठरा प्रकरणे अंतर्भूत असून प्रत्येक प्रकरण वाचल्यावर आपण अंतर्मुख होवून विचार करतो आणि आत्मशोध घेतो हीच लेखिकेच्या लेखनाची ताकद आहे.हे पुस्तक वाचल्यावर लेखकेचे हे पहिलं पुस्तक आहे असे मुळीच वाटत नाही..लहानपणापासून वाचनाची आवड आणि लग्न झाल्यावरही सासरी तेच वातावरण असल्याने मनतरंग सारखे तरंगण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाले.
मुखपृष्ठ हे या पुस्तकातील डेफोडिल्स या प्रकरणाशी मिळते जुळते आहे.डेफोडिल्स ही इंग्लिश कविता आम्हांलाही अभ्यासक्रमात होती पण ती कविता आम्ही अभ्यासली फक्त परिक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी,पण लेखिकेने या लेखात त्या कवितेचे सौंदर्य शोधल जे तिला काश्मीर प्रवासात अनुभवायला मिळाले.
आपल्या प्रवासातही अनेक घटना घडतात. काही मनाला ताप देणाऱ्या तर काही मनासारख्या.लेखिका जेव्हा लग्न झाल्यावर हनिमूनसाठी पंचमढीला जाते तेव्हा लेखिकेसारखी दिसणारी रश्मी दिक्षित नावाची १९ वर्षाची मुलगी घरातून पळून गेलेली असते त्यामुळे लेखिकेला दिक्षित समजून पोलीस जो मानसिक ञास देतात आणि शेवटी बँकेचे ओळखपत्र दाखवून सुटका होते.पोलीसांच्या या कृतीमुळे जरी ञास झाला तरी जेव्हा ते असं म्हणतात, ” मॅडम आप तो सिर्फ उन्नीस साल उम्रकी लग रही हो,और वो लडकी भी उन्नीस सालकी है!आपल्याला कमी वयाचे म्हटल्यावर त्या पोलीस अधिकाऱ्यां बाबत आपल्या मनात असलेला राग थोडा सौम्य झाला हे सांगायला लेखिका विसरली नाही.
दक्षिण भारतात फिरताना ताजभाई नांवाचा भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर कम गाईड त्याच्या त्या लाघवी स्वभावामुळे आणि संपूर्ण प्रवासात एक कुटुंबातीलच घटक म्हणून त्याने दिलेली सेवा यामुळे ढवळीकर कुटुंबात आणि ताजभाईमध्ये एक नकळत घट्ट वीण विणली गेली.या लेखात लेखिका शेवटी म्हणते,” कोण होता तो आमचा? ना आमच्या धर्माचा ना जातीचा.पण धर्म आणि कोणत्याही जातीला मागे टाकेल असे अनोखे बंध ताजभाई अवघ्या दोन दिवसांत जोडून गेला.आजच्या धार्मिक उन्मादात ही घटना एक वेगळा संदेश देवून जाते.
प्रत्येकाच्या घरात असा एक कोपरा असतो ज्या कोपर्‍यात बसून आपण पावसाचा आनंद घेतो.थंड वार्‍याची झुळूक अनुभवतो.वाचन करतो.मोबाईल वरून पक्षांचे फोटो काढतो..पण त्या कोपर्‍याचं आपल्यासाठीचे जीवंत अस्तित्व लेखिकेने इतक्या प्रभावीपणे अधोरेखित केलेले आहे की तो कोपरा जणू बोलतोच आहे.
आजकाल नोकरी करणार्‍यांच्या घरात घरकामाला मोलकरीण असतेच.कस्तुरी नावांची मोलकरीण लेखिकेच्या घरात कामाला यायची.काहीही न बोलता निमुटपणे सगळे काम करायची.तिच्या लाघवी स्वभावामुळेच ती लेखिकेच्या घरातीलच एक घटक बनली होती.माञ पैशाची चणचण म्हणून जेव्हा ती आपल्या मुलांचे शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेते आणि हे जेव्हा लेखिकेला समजते.लेखिका अस्वस्थ होते.राञभर झोपत नाही.आपल्या पतीशी अर्थात संजयजींशी बोलून तिच्या मुलानां संपूर्ण शिक्षण देण्यासाठी मदत करते ही कस्तुरी या प्रकरणातील वास्तव घटना माझ्या सारख्या सामाजिक क्षेञात काम करणार्‍या कार्यकर्त्यांला उर्जा देणारी आहे.
या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे लेखिकेच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि त्या अनुषंगाने भेटलेली विविध स्वभावाची माणसे,त्यांचा स्वभाव,वागणं यांची इतकी सुंदर सांगड घातलेली आहे की वाचताना ती व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी रहाते.
लेखिकेची मुलगी कु.शलाका जी आता वकील आहे,तीने जेव्हा पहिले मतदान केले त्यावेळचा तिचा उत्साह,स्वंतञ भारताची मतदार म्हणून आपल्या आईवडिलांना ठणकावून सांगते,”मी कुणाला मतदान करायचे ते मीच ठरवणार ” मुलगी विचाराने परिपक्व झाली याची जाणीव लेखिकेला आत्मिक समाधान देवून जाते हे ” तिचे मतदान ” या लेखात अनुभवायला मिळते.
मी वीस वर्षे पोस्टात काम केल्याने काय ञास असतो हे अनुभवलयं आणि म्हणूनच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.पोस्टात संसार सांभाळून काम करणार्‍यां महिला कर्मचाऱ्यांची होणारी ओढाताण, कुचंबणा,व्यथा आणि कथा एवढ्या ताकदीने मांडली आहे ते प्रकरण वाचल्यावर मला पंचवीस वर्षापूर्वीचे ते ” पौष्टिक जीवन” आठवले.ही शब्दांची ताकद दिसून येते
ताकदीचे पञकार,लेखक,राजकीय विश्लेषक आणि लेखिकेचे पती व आमचे मार्गदर्शक श्री संजय ढवळीकर यांच्या आग्रहास्तव लेखिकेने वास्तव घटनांवर वाचकांच्या मनात निर्माण केलेले मनतरंग निश्चितच पुस्तक वाचल्यावर समाधान देणारे आहे.आजकाल वाईट गोष्टी आपल्याला तात्पुरते मनोरंजन देतात पण अशा साहित्यकृती जगण्याची नवी उमेद देतात.
उज्वलाताई,तुमचा हा पहिला प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झाला.अभिनंदन. पण इतक्यावरचं न थांबता आपल्या ज्या अजून डायरी आहेत त्या पण प्रकाशात आणा जेणेकरून माझ्या सारख्या वाचकाना सुंदर साहित्यकृतीचा निर्भेळ आनंद घेता येईल. त्यासाठीच शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा