ज्येष्ठ स्थापत्य अभियंता डॉ. दिनेश नागवेकर यांना ‘राजदूत पुरस्कार’ प्रदान
सावंतवाडी :
दिल्ली येथील ‘न्यू थिंक फाऊंडेशन’ आयोजित राष्ट्रीय परिषदेत सावंतवाडीचे ज्येष्ठ स्थापत्य अभियंता डॉ. दिनेश नागवेकर यांना राष्ट्रीय पातळीवरील राजदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या एकूण २० मान्यवरांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.
या सोहळ्यास आयुष मंत्रालयाचे माजी सदस्य संचालक डॉ. दिनेश उपाध्याय आणि उत्तराखंड राज्याचे माजी कॅबिनेट राज्यमंत्री कमल सिंग नेगी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. उपाध्याय यांनी, “आज ज्ञान, पदवी आणि संस्कार यांची सांगड तुटलेली दिसते. पुरस्कार हे केवळ शोभेची चिन्हे नसून, कार्याचा सन्मान आणि पुढील वाटचालीसाठीचे प्रोत्साहन आहेत,” असे मत व्यक्त केले.
दिल्ली येथे झालेल्या या राष्ट्रीय परिषदेस न्यू थिंक फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनिता देवी आणि कार्यकारी मंडळाच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक फाऊंडेशनचे जनरल सेक्रेटरी विकास शर्मा यांनी केले.
गेल्या ४५ वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. नागवेकर हे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, इन्स्टिट्युशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स, इन्स्टिट्युशन ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन बिल्डिंग काँग्रेससह स्थापत्य अभियांत्रिकीतील २० संस्थांचे आजीवन सदस्य आहेत. सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राणी पार्वतीदेवी हायस्कूल, दोडामार्ग, चौकूळ, उर्दू, माणगाव, मांडकुली, डोंगरपाल, तळवडे, ओटवणे, कोलगाव हायस्कूल तसेच माणगाव ग्रंथालय व भंडारी समाज महिला वसतिगृहाच्या इमारतींसाठी विनामोबदला मार्गदर्शन केले आहे.
यापूर्वी डॉ. नागवेकर यांना कोकणसादचा ‘स्मार्ट लिडर’ आणि सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र यांसह राष्ट्रीय पातळीवरील १४ पुरस्कार प्राप्त झाले असून, राजदूत पुरस्कार हा त्यांच्या कार्यातील आणखी एक मानाचा शिरपेच ठरला आहे.
