*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कोणतं हवं, वर्ष नवं*
आले आले वर्ष नवे
जल्लोषाचे वर्ष नवे
ह्या नववर्षाच्या स्वागतासाठी…
मनात रचुन अनेक बेत
सारी तरुणाई चालते हवेत
तयारीला लागतात बार आणि पब
हॉटेल/ ढाब्यांची चाले लगबग
निशाचर बनुन साऱ्या रात्रभर
फिरतात मजेने सर्वजण रस्त्यावर
मागे नसती मुळीच यात महिला
स्त्री मुक्तीचा आता झेंडा रोविला
अंग-प्रदर्शन, धूम्रवलयं, वारूणीचा संग
नव्या वर्षासाठी हवेत असले रंग?
मद्यधुंद पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा पदरच नाही तर मग काय सावरा!
बेताल होती नजरा अन हात
स्त्री-दाक्षिण्याची सोडाच बात
ठीक बारा वाजता होतो फटाक्यांचा मारा
पशुपक्षी बिचारे फिरती सैरावैरा
माणसांचीच नाही तर त्यांची कुठली जाण
पर्यावरणाचे नसते कोणालाच भान
नववर्षाचा सूर्योदय केव्हाच जातो होऊन रात्रीचा हँगओव्हर उतरलाच कुठे अजून
बातम्या छेडछाडीच्या, धक्काबुक्कीच्या, बलात्काराच्या, नशेत झिंगून पडण्याच्या
किती चढावा रंग आपल्यावर पश्चिमेचा
आपणच गळा घोटाळा आपल्या संस्कृतीचा?
पानगळीने निष्पर्ण वृक्ष, शिशिरातील उदासी
वृक्षातळी पडतात पिवळ्या पानांच्या राशी
‘ह्या’ नववर्षाच्या स्वागतात दिसतो का पावित्र्याचा, मांगल्याचा जराही लवलेश?
तरीही आपल्या मनाला होत नाहीत क्लेश?
आपलंच शहाणपण जेव्हा त्यांच्या मार्फत आपल्याकडे येईल
तेव्हाच आपले डोळे खाडकन ऊघडतील
खूप उशीर झालेला असेल तोवर कदाचित
उघड्या डोळ्यांनी पाहत राहू आपण होऊन अगतिक
आले आले वर्ष नवे,
मांगल्याचे वर्ष नवे
त्या नववर्षाच्या स्वागतासाठी…
पंधरा दिवस आधीच होळी करतो अमंगलाची, अपवित्रतेची, अशुचितेची
शुचिर्भूत होऊन उभारतो उंच गुढी समृद्धीची, कर्तृत्वाची, आरोग्याची
सारं वातावरण होतं मंगलमय उत्साही पारंपारिक वस्त्रालंकारांचा साज लेऊन गुढी उभारण्याची होते घाई
साखरेची गोडी – धनधान्याचे प्रतिक तांब्याच्या भांडं – समृद्धीचे द्योतक
फुलं आणि आंब्याची पानं निसर्गाचे रूप
आणि कडूलिंब म्हणजे साक्षात आरोग्यदूत
चैत्र पालवीने निसर्ग दिसतो बहारदार
प्रसन्नतेने भरून जाते मन अपरंपार
गुढी उभारण्यामागे जोडल्या गेल्यात अनेक पारंपारिक, ऐतिहासिक कहाण्या म्हणून एक दिवस गुढीलाही लाभे देवपणा
पुजा करून नैवेद्य दाखवतो गुढीला त्याचा वारसा देतो पुढच्या पिढीला
पहाटेच्या प्रसन्न प्रहरी करून देवदर्शन गुढी उभारून करतो कडूलिंबाचे सेवन
कुठे श्रीखंड पुरी, कुठे असते पुरण दुपारी मिष्टांनाचे साग्रसंगीत जेवण
साडेतीन मुहूर्तांपैकी एक प्रमुख मुहूर्त सुवर्ण खरेदीसाठी छानसे निमित्त
गृहप्रवेश आणि भूमिपूजन
शुभकार्याचे मंगल आयोजन
शहरातुन निघतात देखण्या शोभायात्रा स्त्री-पुरुष खेळतात लेझीम आणि टिपऱ्या
सर्वजण साधतात लय आणि ताल
माखुन घेतात अंगावर गुलाल
साऱ्यांना असतो मांगल्याचा स्पर्श
असे हे आपले सात्विक, मंगल नव-वर्ष
आपण सारेच आहोत सुज्ञ, करूया जरा विचार-विमर्श
कोणते वाटावे हवेहवेसे? हे नवं वर्ष की ते नवं वर्ष?
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.
