You are currently viewing मनातलं विवर

मनातलं विवर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनातलं विवर*

 

गूढ, गहिरे, नि:शब्द खोल,

जिथे विचारांचे तुकडे

प्रकाशाच्या लहरींशी खेळतात,

भावनांचे प्रतिबिंब उमटतं,

कधी सावलीत, कधी झगमगाटात.

शांत पाण्यावर हलक्या लहरी उठतात,

एक विचार दुसऱ्यात गुंततो,

कधी तरंगतो, कधी हरवतो,

कधी स्वतःलाच विचारतो “मी कोण?”

मनाचे विवर म्हणजे

अंधारात उमलणाऱ्या

निळ्या कमळासारखा अनुभव,

ज्याचा सुवास

कुणालाच सांगता येत नाही,

फक्त जाणवतो ,

क्षणाक्षणाला, थरथरत्या श्वासांत.

कधी त्यात आठवणींचा

धुरकट प्रवाह असतो,

कधी स्वप्नांचे निळे फुगे डोलतात ,

कधी वेदना थेंबथेंब सांडतात…

आणि शब्दही शांत होतात तिथे.

मनाचे विवर

जिथे अंतःकरण आपल्याला भेटते,

जिथे ‘मी’ आणि ‘माझे’ विरघळतात,

आणि फक्त आतला नाद उरतो

अनामिक, पण आपला!

 

 

©️®️ डॉ  मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा