*राजकीय विशेष…..*
*जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थक खास. नारायण राणेंच्या भेटीला…*
*राणे समर्थक आणि चव्हाण समर्थक रंगणार राजकीय सामना..?*
सिंधुदुर्गातील भाजपा म्हणजे राणे..! असेच गणित राणेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्हावासियांना दिसून आले होते. त्यापूर्वी देखील राणेंची जिल्ह्यातील ताकद जिल्हावासियांनी अनुभवली आहे. खास.नारायण राणे शिवसेनेत असताना जिल्हा भगवामय होता, राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेसमय झालेला तर स्वाभिमानी पक्षाची स्थापना केल्यावर राणेमय राहिलेला. त्यामुळे जिल्ह्यातील राणेंचा प्रभाव गेली तीन दशके आपण पाहत आहोत. राणे कुठेही गेले तरी त्यांचे कार्यकर्ते राणे समर्थक म्हणवून घेण्यात धन्यता मानतात, मतदार देखील त्यांच्यासोबतच राहतात यासाठी कणकवली नगरपालिका निवडणूक हे जिवंत उदाहरण आहे. परंतु अलीकडे राणेंना दूर ठेऊन भाजपाचे प्रदेश नेतृत्व कट्टर भाजप कार्यकर्ते करण्यासाठी प्रयत्नशील असून राणे समर्थकांना संधी साधून दूर केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणेंचे कट्टर समर्थक असलेले भाजप कार्यकर्ते राणे यांची भेट घेत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे लवकरच होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राणे समर्थक व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण समर्थक असा भाजपमध्येच संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वाढली आहे.
अलीकडेच जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, त्यात सावंतवाडी व वेंगुर्ला नगरपरिषद भाजपकडे गेली तर मालवण शिवसेनेने आपल्या ताब्यात ठेवली. यावेळी कणकवली नगरपरिषद भाजप सहज जिंकेल अशी शक्यता असताना पालकमंत्री नितेश राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची समर्थ साथ असून देखील एकट्या आमदार निलेश राणेंनी संदेश पारकर यांच्या विजयासाठी रक्ताचे पाणी करू असे जाहीर करताच राणे समर्थकांनी हा राणेंचाच आदेश समजून काम केले. त्यामुळे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांचा पराभव करून कणकवली नगर परिषद शहर विकास आघाडीकडे पर्यायाने शिवसेनेच्या नेतृत्वात आणली. निलेश राणे म्हणजे खासदार नारायण राणे यांचे रूप मानून राणे समर्थकांनी निलेश राणे यांच्या शब्दाचा मान राखत कणकवलीत संदेश पारकर यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. त्यामुळे नितेश राणे जरी भाजपचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात कार्यरत असले तरी भाजप प्रदेश नेतृत्वाकडून राणेंचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आल्याने कणकवलीत राणे समर्थकांनी आणि कणकवली वासीयांनी “आजही राणे भाजपमध्ये असले तरी आम्ही राणे यांच्या सोबतच आहोत” हे दाखवून दिले.
कणकवली नगर परिषद निवडणूक राणे विरुद्ध चव्हाण यांच्या संघर्षात राणे यांचा विजय होणार यावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. त्यामुळेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राणे समर्थकांना डावलण्यात येईल आणि चव्हाण यांचे समर्थक भाजपकडून निवडणुका लढण्यास अग्रेसर राहतील याची शाश्वती असल्याने राणे समर्थक भाजप कार्यकर्ते खासदार नारायण राणे यांची भेट घेत आहेत. यामध्ये राणेंची भेट घेत पुढील संघर्षाची दिशा काय असेल याचे उदाहरण कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील राणे समर्थक महेश सारंग यांनी दिले. अलीकडे सावंतवाडीत झालेल्या विशाल परब यांच्या कार्यालयातील बैठकीत कोलगाव पंचायत समितीचे माजी सदस्य शिवसेना कार्यकर्ते मायकल डिसोजा यांना भाजपमध्ये प्रवेश देत महेश सारंग यांना दूर ठेवण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महेश सारंग यांनी नारायण राणे यांची भेट घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात नारायण राणे यांना मानणारे तळागाळापर्यंत कार्यकर्ते आहेत. जनतेच्या अडल्या नडल्या संकटात राणेंनी मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. त्यामुळे तळागाळातील मतदार राणेंच्या समर्थनार्थ भाजपला मतदान करत आहेत. परंतु, नारायण राणे यांना वगळून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिंकणे भाजपला कदापि शक्य होणार नाही. कारण याची प्रचिती खास.नारायण राणे यांना नगरपालिका निवडणुकीत दूर ठेऊन, अर्थकारण करून देखील कणकवली नगरपरिषद गमावून भाजपाने घेतलेली आहे. एवढंच नव्हे तर मालवण नगरपालिकेत शिवसेनेला शून्य म्हणणाऱ्या भाजपला पाच जागांवर समाधान मानावे लागले आणि दोन्ही शिवसेना (अपक्ष 1) मिळून पंधरा जागा जिंकण्यात यशस्वी झाल्या आहेत. ही तर भाजप प्रदेश नेतृत्वासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. त्यामुळे राणे समर्थकांना डावलून बाहेरून आयात केलेल्या नव्या भाजपवासींना निवडून आणण्यासाठी भाजप नेतृत्वाला कसरत करावी लागणार किंबहुना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात येताना देखील कठीण होऊन जाईल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही…कारण, शिवसेनेकडे नारायण राणे यांच्या आशीर्वादाचा हात असलेले आम.निलेश राणे भक्कमपणे उभे आहेत.
जनता अंधी नहीं है वो सब जानती है।
खास.नारायण राणे जिल्ह्यात असूनही प्रचारात सामील झाले नव्हते हे जिल्हावासीय जनतेने पाहिले होते. त्यांनी आपला आशीर्वाद भाजपच्या उमेदवारांना असल्याचे बोलले तरी ते आम.निलेश राणे यांच्या पाठीशी असल्याचे न कळण्या एवढी जनता दुधखुळी नाही आहे. त्यामुळेच न बोललेल्या खास.राणेंचा पाठिंबा निलेश राणे यांना असल्याचे जाणून राणे समर्थकांनी कणकवलीत नितेश राणेंचा पाठिंबा असलेल्या भाजपच्या समीर नलावडे यांना पराभवाची धूळ चारली हे जगजाहीर झाले आहे. भाजप प्रदेश नेतृत्वाचा असाच हट्ट यापुढे होणाऱ्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राहिला तर याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे भाजप प्रदेश नेतृत्वाला यावर नक्कीच विचार करावा लागणार हे मात्र निश्चित..!
