नवी पेठ, पुणे :
मराठी कविता व गाणी या विषयावर आयोजित करण्यात आलेला स्वरगंध प्रस्तुत “माझे मन तुझे झाले” हा कविता आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम गुरुवार २५ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी प्रभू ज्ञान मंदिर नवी पेठ येथील सभागृहात उत्साहात पार पडला.
श्री नवीन श्रीकांत अगरखेडकर यांच्या स्वरचित मराठी कविता आणि त्या कवितेच्या अनुषंगाने गायलेली भावगीते श्री नवीन अगरखेडकर आणि सौ प्रीती करंदीकर यांनी अतिशय सुरेल रित्या सादर केली.
प्रेम व विरह हे दोन विषय घेऊन केलेल्या भावना पूर्ण कविता या कार्यक्रमांमध्ये सादर केल्या व त्यावर अविट गोडीच्या मराठी गाण्यांनी सुवर्ण साज चढवला गेला. नवीन अगरखेडकर व प्रीती करंदीकर यांच्या गायनाच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती लाभली. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक करण्यात आले. मराठी कविता व मराठी संगीताची गोडी रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. सुप्रसिद्ध राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचे नातू लेखक कवी व विविध साहित्य विश्वात कार्यरत असलेले श्री प्रकाश तांबे, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि संयोजक श्री मदन रोडगे, म्युझिक ब्लीस व्होकल स्टुडिओ चे संस्थापक श्री आशुतोष उमराणी, सुप्रसिद्ध कवी श्री बाबूजी डिसूजा कुमठेकर, साहित्यिका सौ.माधुरी वैद्य कुमठेकर या सर्व मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
मराठी कविता आणि त्याच्या अनुषंगाने सादर केलेली गाण्यांची संकल्पना रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
असेच नवनवीन कार्यक्रम सादर करण्याचे आश्वासन कलाकारांनी दिले व कार्यक्रमाची सांगता झाली.
