You are currently viewing शांत रात्रीच्या कुशीत…!

शांत रात्रीच्या कुशीत…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शांत रात्रीच्या कुशीत…!*

 

 

शांत रात्रीच्या कुशीत नभांगण ते खुलते,

चांदण्यांच्या डोळ्यांतून प्रकाशून चमकते..

 

दिवसाच्या गोंगाटाला रात्री विश्रांती मिळते,

हळुवार अशी शांती मनातही उतरते..

 

थांबलेल्या वार्‍यालाही काही सांगत बसते,

अंधारात उजेडाची वाट हीच दाखवते..

 

खरे आत्म्याचे भानही एकांतात उमगते,

हरवले जे दिवसा रात्रीतच गवसते..

 

झोपलेल्या गावावर स्वप्नचादर घालते,

थकलेल्या मनालाही उबदार ती वाटते..

 

अंतरंगातली हाक नि:शब्दांत उमटते,

साक स्वत:चे स्वगत शांततेत ऐकू येते..

 

ओझे दु:खांचे हळूच रात्र बाजूला ठेवते ,

आणि थांब जरा क्षणी माणसाला शिकवते..

 

झोप रात्रीत मायेची वेदनांनाही लाभते,

धगधग काळजाची शांत कुशीत विरते..

 

स्वप्नांच्याच पावलांनी आशा दाराशी थांबते,

हृदयाच्या गाभार्‍यात चाहूल उद्याची देते..

 

अंधारही इथे शत्रू कधी कुणाचा नसतो,

उजेडाचा जन्मदाता म्हणूनच तो उरतो..

 

नव्या सकाळचा सूर्य शांततेत उगवतो,

शांत रात्रीच्या कुशीत जिवांकुर उमलतो..

 

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा