कारभार स्वीकारला नाही, भेटीसाठी राजवाड्याचा रस्ता धरावा लागणार का? – संजू परब यांचा सवाल
सावंतवाडी :
नगरपालिका निवडणूक होऊनही अद्याप नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी कारभार स्वीकारलेला नसल्याने सावंतवाडी नगरपालिकेतील नगराध्यक्षांचा कक्ष आजही बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे शहरातील नागरिक व नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “आता नगराध्यक्षांना भेटण्यासाठी थेट राजवाड्यात जावे लागणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, श्री. परब व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी आज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण एकत्र आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याच वेळी नगराध्यक्ष भोसले यांचा केबिनचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. नागरिकांना भेटण्यासाठी नगराध्यक्षांचा कक्ष खुला असणे अपेक्षित होते. दुपारचे बारा वाजून गेले तरीही कक्ष न उघडल्याने नाराजी आणखी वाढली. यामुळेच नगराध्यक्षांना भेटण्यासाठी राजवाड्यात जावे लागणार का? असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
यावेळी नगरसेवक अजय गोंदावळे, बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.
