सावंतवाडी प्रभाग ७ मध्ये संजू परब यांचा दणदणीत विजय
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपालिकेतील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) गटाचे उमेदवार संजू उर्फ सचिदानंद परब यांनी भाजपचे उमेदवार उदय नाईक यांचा तब्बल ४८१ मतांनी पराभव करत लक्षवेधी विजय नोंदवला आहे.
या प्रभागात भाजपकडून परब यांचा पराभव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. विरोधकांकडून धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याची चर्चा असतानाही, परब यांनी आपल्या कामाच्या जोरावर आणि मतदारांशी असलेल्या थेट संपर्कामुळे भाजपला धूळ चारत विजय खेचून आणला.
स्थानिक विकासकामे, सातत्याने केलेला जनसंपर्क आणि सामान्य मतदारांशी असलेली नाळ हे या विजयामागील प्रमुख कारण ठरले. प्रभागातील जनतेने धनशक्तीला नाकारत जनशक्तीचा स्पष्ट कौल दिला असल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे.
या विजयात संजू परब यांच्या पत्नी संजना परब यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली. त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच परब यांना आजचा विजय मिळाल्याचे बोलले जात आहे.
एकूणच सावंतवाडीतील या निकालामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, प्रभाग ७ मधील जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की काम करणाऱ्यालाच संधी मिळते.
