You are currently viewing अविनाश आवलगावकरांची कविता

अविनाश आवलगावकरांची कविता

मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अविनाश आवलगावकर यांच्या काव्य लेखनाची समीक्षा

 

अविनाश आवलगावकरांची कविता

 

 

मराठी साहित्य विश्वात कथा, कादंबरी, समीक्षा, संशोधन पर लेखन करणाऱ्या कित्येक दिग्गजांच्या लेखनाची सुरुवात कविता लेखनानेच झालेली दिसते. मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर ही याला अपवाद नाहीत. ‘किलबिल’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९८३ मध्ये प्रकाशित झाला. त्यातील बाल कवितेचे धुमारे मनाला सुखवून जातात. मराठी साहित्य प्रवाहात बाल वाङ्मय तसे उपेक्षितच राहिलेले दिसते. मग त्याला कारणे कोणतीही असोत. मात्र ‘किलबिल’ मध्ये चिमुकल्यांचे जीवनविश्व निखळ रंजनपर शब्दांत चित्रित केले आहे. या कविता वाचल्यावर लक्षात येते, कवीने बाल मानसशास्त्र डोळ्यासमोर ठेवून याची निर्मिती केली. विनोदातील निर्भेळ आनंदाचा आविष्कार करण्यात कवी यशस्वी झाले आहेत. ही निर्व्याज विनोदाची पखरण वर्तमान सामाजिक समस्या, कालबाह्य रूढी, माणसाची स्वार्थांधता यांना लक्ष्य करून फुलत जाते. सुमार योग्यता असलेला पण लग्नात बडेजाव मिरवणारा नवरदेव (भुलबा नवरा), प्रसिद्धी वेडा कवी (असतो असा कवी), आशयानुकूल प्रतिमांचा अवलंब करून राजकारणावर टाकलेला प्रकाश (मंत्रीमंडळ) असे नित्याच्या अवलोकनातील हे विषय सहज, साध्या शब्दांत गुंफून ही कविता साकारली.

खरे तर साधे सोपे लिहिणेच कठीण असते. कठीण लिहिणे सोयीचे नि सोपे असते (कारण ते अनेकांना कळणार नसते). खुसखुशीत शब्दांतल्या या कविता बालकांना रूचतातच, पण मोठ्यांच्या परिटघडीच्या चेहऱ्यावर खळी निर्माण करतात. नित्याच्या धकाधकीच्या, खोट्या मानापानाच्या नि रुसव्याफुगव्यांच्या समाजात फसवे मुखवटे धारण करून वावरणाऱ्यांचाही थोडावेळ विरंगुळा करतानाच नकळत त्यांच्या गंभीर चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवून जातात. आज दुसऱ्याला रडविणारे पुष्कळ आहेत. पण हसविणारे शोधावे लागतात. या कवितेने असे दुर्मिळ व्यक्तित्व दाखविले आहे.

अंजन आणि रंजन अशी ‘किलबिलची’ मांडणी आहे. जीवनातील स्वार्थांधता, लबाडी, फसवेगिरी, कामचुकार वृत्ती यांना लक्ष्य करीत प्रसवणारी ही कविता जीवनातल्या मूल्यात्मतेलाही जपणारी, जोपासणारी निर्भांत, पण संवेदनशील कविमनाची भावाभिव्यक्ती आहे. बालमनाची सूक्ष्म स्पंदने टिपतानाच प्रौढांच्या अर्थसमृद्ध आणि ध्वनिसमृद्ध समूहजाणिवांचीही अभिव्यक्ती तेवढ्याच उत्कटतेने करण्यात ती यशस्वी होते. या कविता बालकांना हसवितानाच आपले निरागस बालपण हरविलेल्या मोठ्यांना अंतर्मुख करणाऱ्या आहेत. हा त्यांचा स्पृहणीय विशेष! मात्र शेवटी ही कविता वाचल्यानंतर प्रौढांच्या रूक्ष जीवनाहून इवल्याशा पाखरांची जणू चांदण्यात भिजलेली ही रुणझुणती लोभसवाणी पायवाटच अधिक लक्षात राहते.

 

 

‘सांजबावरी’ (१९९५) या अविनाश अवलगावकरांच्या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता कधी सरळ, तर कधी प्रतीकप्रतिमांच्या वाटावळणांनी प्रवासणाऱ्या आहेत. त्या आत्मनिष्ठ आणि सामाजिक जाणीवनेणिवेच्या पातळीवर अभिव्यक्त होत जातात. अनिवार्य एकाकीपण आणि औदासिन्य सहजतेने टिपणारी, हरले हरवलेपणाचे आवेगी चित्रण करणारी ही कविता चोखंदळ रसिक मनाला भावणारी आहे. प्रणय ‘सांजबावरी’ ची मध्यधारा आहे. येथे अधिकतर आत्मनिष्ठ भाव असला, तरी सामाजिक जाणिवांची चिंतनशील वीण या कवितेच्या समृद्धतेत भर घालणारी आहे. अर्थसमृद्ध भाव व ध्वनिसमृद्ध रचनांसह अनिरुद्ध स्पंदनातून ती उत्कट व हृदयस्पर्शी होत जाते. येथे प्रेम आहे ते निःसीम. दुःख आहे ते पारदर्शी, पण अंतर्मुख करणारे. हृदयातील आर्तता सहज, अनलंकृतपणे आणि तटस्थतेने अधिक वास्तव होत जाते. एकूण छपन्न कवितांचा हा पुष्पगुच्छ विविध फुलांनी सुशोभित दिसतो. यातील काही फुलांना रंग, तर काहींना गंध आहे. एकाने दुसऱ्याची उणीव भरून काढावी असा. पुष्पगुच्छाचे ते वैशिष्ट्यच असते. मोगऱ्याची फुले गंधांनी घमघमलेली, तर बोगणवेलीची फुले रंगानी डवरलेली असतात.

प्रस्तुत संग्रहात प्रणयकवितेप्रमाणेच सामाजिक जाणीवपर कविताही तेवढ्याच उल्लेखनीय आहेत.

 

मानुषमूल्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या, विविध ऋतूतील निसर्गसान्निध्यात वावरताना त्या रसिकांनाही आपला सहप्रवासी करतात. निर्भय, निर्भीड परंतु आपल्या अंतरंगातल्या भावनांशी त्या प्रामाणिक आहेत. साधेपणातले सौंदर्य येथे प्रतीत व्हावे. ‘हसता सखे तू गाली, कविता फुलून आली’ ही कवितेची सुरुवात आणि ‘ओठांवरी कळीच्या, गेली पुसून लाली’ हा कवितेचा शेवट पाहिला की, उपरोक्त विधानाची महती पटावी.

मराठीत प्रेमकवितेला दीर्घ परंपरा आहे. ‘सांजबावरी’ याच वाटेवरच्या प्रवासातले एक वळण आहे. चिंतन मननाच्या स्नेहगंधाने ते लोभस रूप धारण करते. ‘सांजबावरी’ मध्ये आत्मनिष्ठ जाणिवेच्या कित्येक कविता रसिकमनाची हळुवार तार छेडताना दिसतात. ‘काळोख’ ही प्रेमविश्वातली आवलगावकरांची शोकात्म कविता आहे. मिर्झा गालिबच्या कवितेत वेदना आहे. मात्र या वेदनेनेच गालिबला अमर केले. ‘काळोख’ ही कविता या वाटेवरचे गळलेले म्लान पुष्प आहे. पण कधीतरी ते गंधवेड्या वेलीवर फुललेले होते. काही फुले गळली, कोमेजली, वाळली, तरी सुगंध देत राहतात. कारण ती बकुळीची असतात. खरे तर ही गझल आहे. तोच भावगंध, तीच शब्दांची नजाकत नि आर्तता, तीच अर्पणोत्सुकता आणि शोकांतसुद्धा. या कवितेच्या पाचही कडव्यांतली रंगगंधांची मुक्त उधळण सूक्ष्म व तरल भावच्छटांसह शब्दांकित झालेली आहे. गुंफण सुरेख झाली, तर विविधांगी फुलांचा हारसुद्धा शोभून दिसतो. या कवितेचेही तसेच आहे. तिचे शीर्षक ‘काळोख’ असले, तरी तिच्या अंतरंगात प्रकाश जाणवतो.

 

आजवरी साऱ्याच वाटा सजविल्या होत्या फुलांनी,

संपली आता फुले अन् पावले काट्यावरी,”

हे कठोर सत्य आहे. सत्य हे कठोरच असते, पण ते सत्य असते. त्यामुळे स्वीकारावेच लागते. एकेकाळी फुलांनी वाटा सजविल्या. परंतु आता फुले नाहीत. शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. स्थल, काल, परिस्थिती, व्यक्ती अशा कशाच्या का होईना ! यात कोणी, कोणाला, का, कसा दोष द्यायचा? तेजस्वी असला, तरी सूर्य मावळतो. आल्हाददायक प्रकाश देणाऱ्या चंद्रालाही ग्रहण लागते. हा या सृष्टीचा, जगाचा, जीवनाचा परिपाठच आहे. बालकवी एका कवितेत म्हणतात,

“कडकडला गगनी तारा,

ढासळला भूवर आला

पाषाण क्षणार्थी झाला,

हा प्रभाव या जगताचा,

दोषावे यात कोणाला?”

‘काळोख’ या कवितेत कवी प्रेयसीला दोष देत नाही. तिच्यावर चिडत नाही, रागवत नाही, तो निश्चल आहे. ‘सुखदुःखे समकृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ या ‘गीतेतील’ तत्त्वज्ञानासारखा त्याच्याजवळ संयम आहे. सहनशीलता आहे, औदार्य आहे. प्रेमात त्यागाला महत्त्व असते. त्यासाठी मनाची उच्चतम अवस्था असावी लागते. ती कवितानायकाजवळ आहे.

प्रणय, संघर्ष, वेदना, एकटेपण, अपयश या पंचतत्त्वांचा आविष्कार कधी स्पष्टपणे, तर कधी प्रच्छन्नतेने कित्येक समर्थ कलाकृतीत जाणवतो. प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन सर्वच उत्तम कलाकृती याला साक्षी आहेत. कलावंताच्या मनोवृत्तीतील तगमग, अगतिकता, अस्वस्थता यातच उत्तम कलाकृतीची बीजे सामावली असतात. पुढे त्यांचाच डौलदार वृक्ष होतो. प्रस्तुत कवितेचे शीर्षक ‘काळोख’ आहे. तो कविमनातील आहे.

 

कुसुमाग्रजांच्या कवितेतील देवदूत काळोखात एकटा आहे. पण एकाकी नाही. त्याला कशाची तमा नाही की भीती नाही. कलावंताचे असेच असते. तो एकटा असतो. परंतु त्याच्या अंतरंगात समाजाच्या व्यथावेदना, आशा, निराशा, रंगगंध आंदोलन असतात. हे सारे अपूर्व असते. नित्यनूतन असते. ते शब्दांतही मांडता येत नाही आणि शब्दाशिवायही व्यक्त होत नाही.

आवलगावकरांच्या कवितेत समर्पणवृत्ती, प्रामाणिकपणा, उत्कटता, हळुवारता आहे. कधी तरल नि नितळ भावबंधाच्या धुक्यातून ती वाट शोधते, तर कधी –

“अंतरीच्या, वेदना कळतील, तर तुजला जरी,

ठेवून जाशील, तेव्हा फुल तू कबरेवरी”

अशा निर्वाणीच्या शब्दांत अंतरीची ज्वाला उफाळून येते. त्यातही स्वाभिमान आहे. प्रेयसीच्या अंतःकरणातली विनयशीलता जाणण्याइतकी वैचारिक परिपक्वता आहे. संयमाच्या अवगुंठनात ती प्रवासते. आकाश कोसळते, तरी आक्रोश करत नाही. असे हे कवितेचे अंतर्बाह्य विश्व आहे.

प्रस्तुत कवितेत आत्मनिष्ठेबरोबर चिंतनशीलताही प्रतीत होते आणि चिंतनशीलतेतून वैचारिक बंध डोकावतो. मिलन, विरह यांची आत्ममग्न वृत्ती म्हणून या कवितांची वासलात लावता येत नाही. निसर्गाचे रंगगंध ही तिची प्रावर्णे आहेत. कबर (कविता ‘काळोख’) सारख्या शब्दातून वेगळ्या जीवनविश्वाची जाणीव होते. यातून कवितेचे मुक्त न्यास झंकारतात. कविता ही मुक्त असते. काटेकोर शब्दांच्या बंधनात तिला जखडून ठेवले की, ती गुदमरते. दुर्दम्य इच्छेत किती सामर्थ्य असते, ते कविता सहजतेने सुचवून जाते. ऐन ग्रीष्माच्या काहिलीत एखादा प्रचंड वृक्ष घाव घालून जमिनीपासून वेगळा केला, तरी वर्षा ऋतूत त्याला नवीन पालवी फुटते. ही दुर्दम्य जीवनेच्छा म्हणजे कविमनाची भावोर्मी असते.

 

 

‘सांजबावरी’ मध्ये प्राधान्याने प्रणयप्रधान कविता प्रतीत होत असल्या, तरी जगण्याची लय शोधणाऱ्या कविताही वाचकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. विविध रंगगंधांचा पुष्पगुच्छ म्हटल्यानंतर त्यातच सारे आले. अविनाश आवलगावकरांची प्रस्तुत कवितासंग्रहातील ‘आई’ ही आर्त कविता मराठी कविताविश्वातील याविषयावरील कित्येक समर्थ कवितांचे स्मरण करून देणारी कविता आहे. ही आई केवळ कवीची आई ठरत नाही. ती अखिल दलित, ग्रामीण, आदिवासी साहित्यप्रवाहांतील दैन्यग्रस्त, शोषित, काबाडकष्ट करणारी. तरीही आपल्या तान्हुल्यांना घडविणारी विश्वाची आई वाटते. या कवितेतील करुणरस काळजाचा ठोका चुकविणारा आहे.

“आठवतो तिचा तो

जीवघेण्या वेदना लपविणारा चेहरा

आणि सायंकाळी

चुलखंडाशी बसून

भाकरीबरोबर हात भाजणारी आई

टोपलीभर भाकरी करणारी

नि अर्ध्या भाकरीवर

पोटाची खळगी भरणारी आई.”

हे विदारक जीवनवास्तव आहे. जणू दलित, ग्रामीण साहित्यप्रवाहातील कविता वाचत आहो, असे वाटू लागते. येथे भुकेची वेदना आभाळभर होते. “Poetic truth is almost practical truth” म्हणतात. त्याचे येथे स्मरण होते. तपशिलातील सूक्ष्मता आणि शब्दांचा साधेपणा या कवितेला श्रीमंती बहाल करून जातो. ‘नको देवराया’ या कवितेतून जीवनाच्या पैलतीराचा भास होतो आणि भा.रा. तांबे यांची कविता आठवते. ‘अन् मी हसते’ या कवितेतील शेवटच्या दोन कडव्यांतून मर्ढेकरांचे स्मरण होते. येथे अनुकरणाचा भाग नाही, हे स्पष्टपणे नमूद करावेसे वाटते. जसे दैन्यग्रस्त आई कविता वाचली की, मराठीतील या विश्वातील समर्थ कविताकृती डोळ्यासमोर तरळून जातात. आवलगावकर जेवढ्या उत्कटतेने लयबद्ध कविता लिहितात, तेवढ्याच सहजतेने मुक्तच्छंदातील कविता लिहून जातात. दोन्हींची आवाहनक्षमता सारखी असते. कविता हा त्यांचा लेखनाचा आवडता प्रांत असावा, असे वाटते; तर त्यांची समीक्षा व संशोधन वाचताना हेच त्यांच्या आवडीचे प्रांत वाटतात.

 

तात्पर्य, त्यांची लेखणी सर्वच साहित्यप्रवाहांत मुक्तपणे विहार करते.

‘किलबिल’ नंतर दहा वर्षांनी आवलगावकरांचा ‘सांजबावरी’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. या पुढच्या प्रवासात त्यांच्या कवितेची वाट अधिक प्रशस्त झाली. प्रेमकविता म्हटली की शृंगाररसाचा परिपोष आला. मात्र तो आधिक्याने विप्रलंभ आहे. त्याचा आविष्कार सद्भिरुचीसंपन्न मनाला भावणारा आहे. ‘सांजबावरी’ या संग्रहाच्या शीर्षकातही अर्थाची वलये व विशिष्ट भाववृत्ती प्रतीत होते. दिवस संपला आहे आणि रात्र सुरू व्हायची आहे, अशी ही वेळ संधिकालाची. काहीशी हुरहूर वाटणारी. रुणझुणत्या पावलांनी समोर येणार असलेल्या मंद सुवासिक रात्र जागवणारी. दूरवर आळविला जाणारा प्रकाशराग, तनामनावर विसावणारे चंद्रचांदणे यांची रम्य आठवण करून देणारी अशी ही भाववेडी, गोंधळलेली तरीही बरीचशी समंजस आणि अबोल अशी संध्याकाळ.

 

डॉ. रामदास चवरे, पुणे

संवाद – ८३०८९९८६७२

प्रतिक्रिया व्यक्त करा