You are currently viewing “टर्मिनस आहे की नाही? एकदाच जाहीर करा!” – सावंतवाडी रेल्वे प्रश्नावर प्रवासी संघटनांचा संताप

“टर्मिनस आहे की नाही? एकदाच जाहीर करा!” – सावंतवाडी रेल्वे प्रश्नावर प्रवासी संघटनांचा संताप

सावंतवाडी :

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी झाले असून, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्यासह सत्ताधारी नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. या प्रकल्पासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले असून, पहिली कुदळ स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली होती. तसेच १२ ऑगस्ट २०१६ रोजी राष्ट्रपतींनी या टर्मिनसला मान्यता दिल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांनी दिली.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. निंबाळकर यांनी, “हे सर्व पुरावे कोकण रेल्वेच्या सीएमडींना पुरेसे नाहीत का?” असा थेट सवाल करत टोला लगावला. सचिव मिहीर मठकर यांनीही, सावंतवाडी हे टर्मिनस आहे की नाही, याबाबत एकदाच स्पष्ट घोषणा करण्याचे आव्हान कोकण रेल्वेच्या सीएमडींना दिले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे, महेश परुळेकर आदी उपस्थित होते. ॲड. निंबाळकर म्हणाले की, कोकण रेल्वेचे सीएमडी संतोषकुमार झा यांचे विधान म्हणजे राष्ट्रपतींनी दिलेल्या मान्यतेचा अनादर आहे. टर्मिनससाठी पुरावे मागणे म्हणजे प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासारखे असून, यातून कोकण रेल्वे प्रशासनाची प्रवाशांबाबतची अनास्था स्पष्ट होते.

कोरोना काळात बंद झालेल्या अनेक गाड्या अद्याप पूर्ववत झालेल्या नाहीत. निवडणुका जवळ आल्या की केवळ घोषणा केल्या जातात, मात्र ठोस भूमिका घेतली जात नाही, असा आरोप करत माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राज्य शासन वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी आग्रही असून त्याबाबतची घोषणा झाल्याबद्दल प्रवासी संघटनेने शासनाचे आभार मानले. मात्र ज्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे, तो प्रकल्प अर्धवट न ठेवता तातडीने पूर्ण करावा, अशी ठाम मागणीही ॲड. निंबाळकर यांनी केली.

सीएमडी सावंतवाडीत कार्यक्रमासाठी आले असता त्यांची भेट घेतल्याचे सांगत सचिव मिहीर मठकर म्हणाले की, टर्मिनसबाबत विचारलेला प्रश्नच चुकीचा आहे. यापूर्वी अनेक बैठका, आंदोलन व उपोषणे झाली, तरीही कोकण रेल्वे महामंडळाला प्रवाशांची चिंता नाही. त्यामुळे कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच “टर्मिनस आहे की नाही, हे जाहीर करून दुध का दुध आणि पाणी का पाणी करून टाकावं,” असे आव्हान सीएमडी झा यांना देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा