मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी येथे मराठी साहित्य व कला सेवा आयोजित २२वे कविसंमेलन रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी अत्यंत शिस्तबद्ध, साहित्यिक आणि रसिक वातावरणात संपन्न झाले. शब्द, भावना आणि अभिव्यक्तींचा संगम रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमात “स्वप्नांची शिदोरी”, “वर्षाअखेरचे क्षण” आणि मुक्त विषय यावर आधारित कविता सादर करण्यात आल्या. आशा, संघर्ष, आत्मपरीक्षण, आठवणी आणि नव्या संकल्पांची काव्यमय मांडणी करणाऱ्या रचनांनी रसिकांची मने जिंकली. प्रभावी अभिवाचनामुळे प्रत्येक कविता श्रोत्यांच्या मनात खोलवर पोहोचली.
या कविसंमेलनात अशोक सहदेव सुकाळे, कृपा राकेश म्हात्रे, गिरीश मुरलीधर शेळगीकर, चंद्रकांत दढेकर (अभिवाचन), ज्ञानेश्वर गोपाळराव गोतावळे, डॉ. मानसी पाटील, धनंजय पांडुरंग पाटील, महेश रामनाथ वैजापूरकर (अभिवाचन), मोहित जनार्दन तांडेल, योगिता दशरथ कदम, विक्रांत मारूती लाळे, विलास मारुती अडसुळे, वैभवी विनीत गावडे, प्रल्हाद रामकिशन कसबेकर, प्रकाश वानखेडे आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपापल्या रचना मनोभावने मांडल्या आणि रसिकांना प्रभावित केले.
कार्यक्रमाच्या आस्वादक म्हणून वर्षा गिरीश शेळगीकर यांनी सूक्ष्म निरीक्षणांसह काव्याचा रसग्रहणात्मक आढावा घेतला. निवेदन वैभवी विनीत गावडे यांनी ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रदर्शन गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले. छायाचित्रण विक्रांत मारूती लाळे यांनी केले. अल्पोपहाराची व्यवस्था कृपा राकेश म्हात्रे आणि मोहित जनार्दन तांडेल यांनी स्वेच्छेने सांभाळली.
मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक व अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कविसंमेलनाने मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, सर्जनशीलता आणि रसिक संस्कृती यांचे प्रभावी दर्शन घडवले. शिस्तबद्ध आयोजन आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे २२वे कविसंमेलन यशस्वी ठरले.
आयोजकांनी पुढील उपक्रमाची माहिती दिली; २३वे कवी संमेलन ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित होणार आहे. साहित्यप्रेमींसाठी हा उपक्रमही तितकाच प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
